लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरातील सामान घेऊन जाण्यावरून वाद झाल्यामुळे एका महिलेने (वय ४२) तिच्या दुसऱ्या पतीविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदविली. गोपाल सत्यनारायण अग्रवाल (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे. ते गांधीबागमधील व्यापारी आहेत.
तक्रार करणारी महिला आणि गोपाल अग्रवाल या दोघांचाही दुसरा विवाह दोन वर्षांपूर्वी अकोल्यात झाला होता. महिलेला आधीच्या पतीपासून १७ वर्षांची मुलगी असल्याचे पोलीस सांगतात, तर अग्रवाल यांनाही मुले आहे. चार महिन्यांपासून पती-पत्नीत धुसफुस सुरू झाली. या पार्श्वभूमीवर, अग्रवाल यांनी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दुसऱ्या (तक्रारदार) पत्नीच्या घरात ठेवलेले ड्रेसिंग टेबल, अलमारी, तसेच घरगुती सामान १७ डिसेंबर, २०२०ला दुपारी काढून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. यावेळी अग्रवाल यांचा मुलगा भावेश, तसेच घनशाम, दीपक आणि किसन हे तेथे आले. वादावादीनंतर आजूबाजूच्यांनी पती-पत्नीला शांत केले, परंतु त्यांच्यातील कुरबुर संपली नाही. महिलेने शुक्रवारी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. आपल्या मुलीशी असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला, असेही तिने तक्रारीत नमूद केले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात गोपाल अग्रवाल, त्यांचा मुलगा, तसेच अन्य उपरोक्त जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
-----
वस्तीतील तरुणीचा विनयभंग
नागपूर : वस्तीतील तरुणीचा पाठलाग करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या शुभम राजेश साखरे (वय २३) नामक आरोपीविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तक्रारदार तरुणीने (वय २३) पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री आरोपी साखरेने तिचा पाठलाग करून तिच्याशी असभ्य वर्तन केले.
सदर पोलिसांनी या प्रकरणी साखरेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
---