नागपूर : संपूर्ण भारतीय रेल्वेत झपाट्याने प्रवासी सुविधा वाढविण्यासाठी विकासकामे करण्यात येत आहेत. त्यानुसार दक्षिण पूर्व मध्य रेल्वेंतर्गत येणाऱ्या रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रवाशांना हायस्पीड इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दपूम रेल्वेच्या नागपूर, बिलासपूर, रायपूर विभागातील २०२ रेल्वेस्थानकावर प्रवाशांना हायस्पीड वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाखो प्रवासी या सुविधेचा लाभ घेत आहेत.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे माल वाहतुकीसह रेल्वेस्थानकांवर आधुनिक प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत अग्रेसर राहिले आहे. दपूम रेल्वेच्या नागपूर, बिलासपूर आणि रायपूरअंतर्गत येणाऱ्या ३१६ रेल्वेस्थानकांवर प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेद्वारे दररोज २०१ प्रवासी रेल्वेगाड्यांचे सूत्रसंचालन करण्यात येते. त्याद्वारे लाखो प्रवासी प्रवास करतात आणि रेल्वेस्थानकावर आपला वेळ घालवितात. त्यासाठी वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात नागपूर विभागातील ९१ रेल्वेस्थानक, बिलासपूर विभागातील ८१ आणि रायपूर विभागातील ३० रेल्वेस्थानकांवर वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे लाखो प्रवासी त्याचा लाभ घेत आहेत.