गणेश खवसे
नागपूर : गेल्या तीन महिन्यांपासून पूर्व विदर्भातील गडचिराेली, चंद्रपूर, गाेंदिया आणि आता भंडारा जिल्ह्यात जंगली हत्तींनी उच्छाद घातला आहे. दाेघांचा या जंगली हत्तींनी बळी घेतला असून दाेन गंभीर जखमी झाले. त्यासाेबतच ७६० हेक्टर शेतीचे आणि असंख्य घरांचे नुकसान या जंगली हत्तींनी केले आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील जिल्ह्यात हत्तींमुळे दहशत पसरली आहे. हळूहळू हे जंगली हत्ती पुढे सरकत असून हिवाळी अधिवेशनापूर्वीच नागपूर जिल्ह्यातही प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे, जंगली हत्तींचा हाच मुद्दा यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनात वातावरण तापवू शकताे, असे चिन्हे दिसत आहेत.
ओडिशातून छत्तीसगडमार्गे हे जंगली हत्ती सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला गडचिराेली जिल्ह्यात दाखल झाले. जंगली हत्तींमुळे नागरिकांमध्ये एकप्रकारे कुतूहल हाेते. परंतु हत्तींनी उच्छाद सुरू करताच नागरिकांना सळाे की पळाे करून साेडले. देसाईगंज आणि गडचिराेली परिसरात या जंगली हत्तींनी ४० घरांचे नुकसान केले. साेबतच ४०७ हेक्टर क्षेत्र शेतीचेही नुकसान केले. एवढेच काय तर जंगली हत्तींनी एका वृद्ध महिलेला साेंडेत उचलून फेकले. त्यातच तिचा मृत्यू झाला. यासाेबतच आणखी एकाला जंगली हत्तींनी जखमी केले. त्यामुळे जंगली हत्तींपासून संरक्षण कसे करावे, असा प्रश्न नागरिकांसह वन विभागासमाेर पडला. अनेक प्रतिबंधात्मक उपाय याेजण्यात आले. परंतु ते प्रभावी ठरू शकले नाही. अखेर हे जंगली हत्ती पुढे पुढे सरकत गेले. एक दिवस पहाटेच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी परिसरात दाखल झाले. परंतु तेथून ते माघारी फिरले. काही काळ गडचिराेली जिल्ह्यात ‘आंतक’ केला. त्यानंतर गाेंदिया जिल्ह्याला ‘लक्ष्य’ केले. तेथेही एका व्यक्तीचा जीव घेत, एकाला जखमी केले. १३ ऑक्टाेबर ते २८ नाेव्हेंबर या ४८ दिवसांच्या कालावधीत अर्जुनी मोरगाव तालुक्यासह नागणडोह, केशोरी, कनेरी, नवेगावबांध, जांभळी, बाक्टी, भागी, बोळदे, पालांदूर, बोरगाव, भिवखिडकी, रामपुरी जंगली हत्तींची दहशत हाेती. असंख्य घरांचे तसेच १५० हेक्टर क्षेत्राचे हत्तींनी नुकसान केले.
असे आहेत जंगली हत्ती
पूर्व विदर्भात थैमान घालणाऱ्या जंगली हत्तींची संख्या ही २३ आहेत. यामध्ये एक वयस्क मादी, एक वयस्क नर, सहा बछडे, एक युवा नर व १५ मादी हत्ती आहेत. या जंगली हत्तींचा वावर ज्या भागात असताे, तेथे ‘नेस्तनाबूत’ हाच एक शब्द शिल्लक उरताे.
भंडारा जिल्हा आता ‘लक्ष्य’
आता अलीकडेच २८ नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्ह्यात हे हत्ती दाखल झाले आहे. साकोली तालुक्यातील सानगडी, महालगाव, झाडगाव, केसलवाडा, सिलेगाव, मोहघाटसह लाखनी तालुक्यातील बरडकिन्ही, रेंगेपार कोहळी, पिंपळगाव, मुंडीपार येथे जंगली हत्तींनी आपले राैद्र रुप दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या दाेन तालुक्यातीलच नव्हे तर अख्ख्या भंडारा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे.
पश्चिम बंगालचे पथक
या जंगली हत्तींमुळे दिवसेंदिवस प्रचंड नुकसान हाेत आहे. जीवितहानीच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यावर प्रतिबंध लावण्यासाठी आता वन विभागाने पश्चिम बंगालच्या पथकाला भंडारा जिल्ह्यात पाचारण केले आहे. परंतु, त्यांनाही या हत्तींवर ‘कंट्राेल’ करता आले नाही. गडचिराेलीपासून हे पथक मागावर असूनही त्यांना या हत्तींना कसे काय पिटाळता आले नाही, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
-तर अधिवेशनातही ‘हत्तीं’चीच राहणार चर्चा
गडचिराेली, चंद्रपूर, गाेंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जंगली हत्तींमुळे नुकसान झाले. नागरिकांनी याबाबत वन विभाग आणि प्रशासनाला कळवूनही जंगली हत्ती आता त्यांच्याही आवाक्यात राहिले नाही. त्यामुळे या भागातील आमदार निश्चितच हा मुद्दा घेऊन हिवाळी अधिवेशन तापवू शकतात.