चंद्रशेखर दंढारे
लाेकमत न्यूज नेटवर्क
मेंढला : नरखेड तालुक्यातील मेंढला परिसरात चालू खरीप हंगामात १,१४७ हेक्टरमध्ये खरीप पिकांची पेरणी व लागवड करण्यात आली आहे. ही पिके माेठी हाेताच वन्यप्राण्यांनी त्यांचा माेर्चा शेतांकडे वळविल्याने, या भागातील ३१८ हेक्टरमधील कपाशी, साेयाबीन व अन्य पिकांची नासाडी केली आहे. शेतकऱ्यांना स्वत:चा जीव धाेक्यात घालून रात्री-बेरात्री अंधारात पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतात जावे लागत असल्याने ते त्रासले आहेत. मात्र, वन विभागाला वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची जाग येत नाही.
या भागातील उमठा, वडविहिरा, मेंढला, वाढोणा, रामठी, हिवरमठ, रामपुरी, उदापूर, बानोरचंद्र, पिंपळदरा, दावसा, थडीपवनी, अंबाडा, सायवाडा या गावातील काही शेती जंगलालगत आहे. यावर्षी या भागात साेयाबीनचा पेरा अधिक तर कपाशीची लागवड तुलनेत कमी आहे. शेतकऱ्यांनी तुरीसह इतर पिकांची पेरणी केली असून, काही शेतकऱ्यांकडे संत्रा व माेसंबीच्या बागाही आहेत.
या शिवारात दरवर्षी राेही व रानडुकरांचा वावर असताे. यावर्षी या वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यांना जंगलात पुरेसे खाद्य मिळत नसल्याने, त्यांनी त्यांचा माेर्चा जंगलालगतच्या शेतातील पिकांकडे वळविला आहे. या प्राण्यांनी शेतातील कपाशी व साेयाबीनसाेबतच संत्रा व माेसंबीच्या झाडांचे नुकसान करायला सुरुवात केली आहे. रबी हंगामात हेच वन्यप्राणी खाद्य व पाण्याच्या शाेधात गावालगतच्या शेतात येतात व संत्रा, माेसंबीच्या बागांसाेबतच रबी पिकांचे नुकसान करतात.
वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी अंधारात शेतात जावे लागते. काही शेतकरी शेतातील मचाणावरून पिकाची पाहणी करीत वन्यप्राण्यांवर लक्ष ठेवतात, तर काही शेतकरी रात्रभर जागे राहून शेतात चहुबाजूंनी फिरून लक्ष ठेवतात. अंधारात त्यांना विषारी सापांसह अन्य घातक कीटकांचा दंश हाेण्याची व त्यातून जीव गमावण्याचीही भीती असते. हा संपूर्ण प्रकार लाेकप्रतिनिधींसह वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती आहे. परंतु, कुणीही वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करण्यासाठी पुढाकार घेत नाही, असा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.
...
३१८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान
उमठा परिसरात ८० हेक्टर, वडविहिरा ९० हेक्टर, मेंढला ७५ हेक्टर, वाढोणा ८० हेक्टर, रामठी ५०० हेक्टर, हिवरमठ ८५ हेक्टर, रामपुरी ७० हेक्टर, उदापूर ९० हेक्टर, बानोरचंद्र ७० हेक्टर, पिंपळदरा ७५ हेक्टर अशी एकूण १,१४७ हेक्टर शेती जंगलालगत आहे. या भागात वन्यप्राण्यांचा वावर प्रचंड वाढल्याने, या शिवारातीतील ३१८ हेक्टरमधील साेयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग, बरबटी व अन्य पिकांचे नुकसान केले आहे.
...
तुटपुंजी नुकसान भरपाई
वन विभागाद्वारे या भागातील पिकांच्या नुकसानीची फारशी नुकसान भरपाई दिली जात नाही. वन्यप्राणी पिकांचे किमान एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान करते. वन कर्मचारी त्यांच्या फुरसतीने पंचनामा करतात आणि सहा ते आठ महिन्यांनी दीड ते दाेन हजार रुपये नुकसान भरपाई देऊन बाेळवण करते, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे.
...
शिकारीची परवानगी द्या
जंगल व वन्यप्राण्यांच्या रक्षणाची जबाबदारी वन विभागावर साेपविण्यात आली आहे. या विभागाने काेणताही वन्यप्राणी जंगलाच्या बाहेर येणार नाही तसेच ताे पिकाची नासाडी करणार नाही, यादृष्टीने काळजी घेऊन उपाययाेजना करायला पाहिजे. शेतकऱ्याने सापाला मारल्यास वन अधिकारी शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करतात. त्यामुळे त्यांच्या प्राण्यांचा बंदाेबस्त करावा. ताे करणे शक्य नसल्यास शिकार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.