नागपूर : राज्यात घडणाऱ्या वन गुन्ह्यांचे रेकाॅर्ड ठेवण्यासह गुन्ह्यांचे नियंत्रण व समन्वयातून तपासाचे मार्गदर्शन पुरविण्यासाठी पहिले वन्यजीव गुन्हे कक्ष (वाइल्डलाइफ क्राइम सेल) वनभवन, नागपूर येथे सुरू केला आहे. अशाप्रकारचे हे देशातील दुसरे युनिट हाेय. केरळने २०१७ मध्ये असे युनिट सुरू केले हाेते. या सेलमध्ये वन गुन्हे आणि गुन्हेगारांची कुंडली तयार ठेवली जाणार असून, प्रत्येक प्रकरणाच्या तपासात ते सहायक ठरणार आहे.
प्रत्येक राज्यात वाइल्डलाइफ क्राइम सेल असावा, अशा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य वन विभागाने हे युनिट सुरू केले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तसेच मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या अधिनस्थ या विभागाचा कार्यभार राहणार असून, मुख्य वनसंरक्षक तथा महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिव या युनिटचे प्रमुख राहतील. विभागाचे वनसंरक्षक एस. युवराज यांनी दिलेल्या माहितीनुसार या कक्षा अंतर्गत राज्यात घडणाऱ्या प्रत्येक वन गुन्ह्यांचा डाटाबेस तयार करण्यात येणार असून, मागच्या-पुढच्या गुन्ह्यांची लिंक जाेडून काेणत्याही प्रकरणाच्या तपासात मार्गदर्शन केले जाणार आहे. काेणत्याही प्रकरणात विभागातर्फे प्राथमिक गुन्हा दाखल केल्यानंतर तपास पूर्णत्वास येईलच, असे नसते. अशाप्रकारच्या सर्व गुन्ह्यांची नाेंद करून डीएफओ रँकच्या अधिकाऱ्यामार्फत त्यांचा तपास केला जाईल.
विभागाचा राष्ट्रीय स्तरावर वाइल्डलाइफ क्राइम कंट्राेल ब्युराेशी समन्वय असेल. एखादा वन गुन्हा काेणत्या पद्धतीने झाला, अशाप्रकारचे काम काेण करताे आदींची लिंक जाेडून गरज पडल्यास सायबर सेलची मदत घेऊन तपासात समन्वय स्थापित करण्यासाठी या डाटाबेसची मदत हाेईल. गरज पडल्यास कायदेशीर मार्गदर्शन करून नियमानुसार गुन्हेगारांवर कठाेर कारवाई हाेईल, यासाठी वन्यजीव गुन्हे कक्ष काम करणार आहे. मार्च २०२१ पासून हा कक्ष स्थापन करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली हाेती. कक्ष स्थापन करण्यात आला असून, सध्या डाटाबेस तयार करण्याचे काम सुरू आहे. कक्ष पुरेसा बळकट करण्यासाठी इतर राज्यातील केंद्र अधिकाऱ्यांचाही आधार घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सेल स्थापन करण्यामागे उद्देश
- वन्यप्राण्यांविषयी गुन्ह्यांचा रेकाॅर्ड तयार करणे.
- अनुसूची १ मधील वन्यप्राणी व त्यांच्या संदर्भातील गुन्ह्यांची प्रकरणे तसेच न्यायालयीन प्रकरणे यांचे सनियंत्रण या कक्षामार्फत करण्यात येईल.
- वन गुन्ह्यांच्या तपास कामांमध्ये आवश्यकतेनुसार मदत करणे, मार्गदर्शन करणे.
- न्यायालयीन प्रकरणात कायदेशीर मार्गदर्शन करणे.
- मेळघाट व्याघ्र प्रकल्पात स्थापित सायबर क्राइम सेलशी समन्वय ठेवणे व सायबर डाटाची मदत घेणे.
- वेळप्रसंगी फिल्डवर जाऊनही मार्गदर्शन करणे.
- पूर्वी घडलेले गुन्हे, तपास याबाबत सनियंत्रण ठेऊन तपासाची प्रगती, फाॅलाेअप घेण्यासाठी कारवाई करणे.