महाराजबागेतील कर्मचारी संपावर : प्राणिसंग्रहालयात ३०० प्राणी नागपूर : तुटपुंज्या मजुरीत वाढ करून देण्याच्या मागणीसह महाराजबागेतील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी संप पुकारल्याने येथील वन्यप्राण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. माहिती सूत्रानुसार येथे एकूण २० कर्मचारी कार्यरत असून, यात १६ कंत्राटी तर ४ रोजंदारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र या सर्व कर्मचाऱ्यांना केवळ ९० रुपये मजुरी दिल्या जाते. जेव्हा की वन विभागातील वनमजुरांना ३०० रुपये मजुरी मिळते. त्यामुळे वनमजुरांप्रमाणे आम्हालाही किमान ३०० रुपये मजुरी द्या, या मागणीसह गुरुवारी महाराजबागेतील सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाने महाराजबाग प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. विशेष म्हणजे, येथील सर्व वन्यप्राण्यांच्या देखभालीची जबाबदारी याच कर्मचाऱ्यांवर असून, ते प्रत्येक वन्यप्राण्यांना खाद्य देण्यासह त्यांच्या पिंजऱ्यांची साफसफाई करणे, पाणी पाजणे, परिसराची स्वच्छता करणे आणि उन्हापासून बचावासाठी पिंजऱ्यात लावण्यात आलेल्या कूलरमध्ये पाणी भरणे, अशी विविध कामे केली जातात. मात्र कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही सर्व कामे ठप्प झाली असून, दिवसभर सर्व प्राणी भूक व तहानेने व्याकुळ झाले होते, शिवाय सर्व कूलर बंद पडले होते. सध्या महाराजबागेत सुमारे ३०० वन्यप्राणी आणि पक्षी असून, यात ३ वाघांसह ८ बिबट, २ मगर, १२ नीलगाय, १ अस्वल, २० काळवीट, २० चितळ, २ चौसिंगा, २ पाणमांजर व ६ माकड आहेत. या संपाविषयी महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परिस्थिती गंभीर झाली असल्याचे सांगितले, शिवाय याची आपण वरिष्ठांना माहिती दिली आहे. सध्या महाराजबाग कार्यालयात दोनच कर्मचारी कामावर असून, त्यांच्या मदतीने प्राण्यांची शक्य तेवढी देखभाल ठेवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)७१ मंजूर पदांपैकी ६९ रिक्त महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या देखभालीसाठी एकूण ७१ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु सध्या त्यापैकी केवळ दोनच पदे भरली असून, इतर ६९ पदे रिक्त आहेत. येथील मंजूर पदांमध्ये क्युरेटर, डॉक्टर, झू कीपर, हेड अॅनिमल कीपर, चपराशी, कम्पाऊंडर, शिपाई व लिपिक अशा विविध पदांचा समवेश आहे. परंतु सध्या यापैकी एकही पद भरलेले नाही. अशा स्थितीत प्राणिसंग्रहालय कसे चालणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वन्यप्राणी भुकेने व्याकुळ
By admin | Published: April 14, 2017 2:59 AM