लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पचमढी ते तामिया दरम्यान दाट धुके पसरल्याने कार अनियंत्रित होऊन नागपूरच्या ५५ वर्षीय वन्यजीव प्रेमी महिलेचा अपघातातमृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी ६.४५ वाजता घडला. सुलभा अशित चक्रवर्ती असे या वन्यजीव प्रेमी महिलेचे नाव आहे. त्या वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व असून किड्स फॉर टायगर नावाच्या वाईल्ड लाईफ संस्थेच्या विदर्भातील पदाधिकारी होत्या. मृत सुलभा चक्रवर्ती या अनंतनगर येथील सुराणा ले-आऊट येथे राहतात. वन विभागातील विविध जनजागृती कार्यक्रमात त्या नेहमीच सहभागी व्हायच्या.कौटुंबिक सूत्रानुसार सुलभा या वाईल्ड लाईफ संस्थेशी जुळल्या असल्याने त्या नेहमीच जंगलामध्ये टूरवर असायच्या. कार्यक्रमानिमित्त त्यांना बाहेर जावे लागत होते. याअंतर्गत त्या शनिवारी सकाळीच पचमढीला आपल्या कारने (एमएच/३१/डीसी/८६९७) एकट्याच रवाना झाल्या. त्या तामिया येथील एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. तेथून रविवारी सकाळी त्या कारने पचमढीकडे जात होत्या. सकाळी रस्त्यावर प्रचंड धुके पसरले होते. रस्त्यावरचे काहीच दिसत नव्हते. यातच त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या खाली उतरून थेट पाण्याने भरलेल्या धरणात गेली. कारचे सर्व दरवाजे लॉक झाल्याने त्यांना बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. अपघाताची सूचना मिळताच स्थानिक पोलिसांनी कार आणि महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. कारमध्ये असलेल्या हँडबॅगमधील दस्तावेज आणि मोबाईल सीमच्या मदतीने त्यांची ओळख पटू शकली. सुलभाचे पती आणि त्यांचे मित्र माहिती मिळताच लगेच तामियासाठी रवाना झाले. सायंकाळी उशिरापर्यंत पोस्टमार्टमनंतर कुटुंबीय मृतदेह घेऊन नागपूरला परतले.कौटुंबिक सूत्रानुसार सुलभा चक्रवर्ती यांचे पती अशित हे सीताबर्डी येथील एका चपला-जोड्यांच्या शोरूमचे मालक आहेत. त्यांना रोहन व रोहित अशी दोन मुलं आहेत. रोहन हा दिल्लीला राहतो. त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे तर लहान मुलगा रोहित जर्मनीला शिकत आहे. सध्या दोन्ही मुलं विदेशात आहेत. ते आल्यानंतरच सुलभा यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. ते परवा नागपुरात पोहोचण्याची शक्यता आहे.१५ आॅगस्टला कुटुंबासह साजरा केला वाढदिवससुलभा यांच्या कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १५ आॅगस्ट रोजी सुलभा यांचा वाढदिवस होता. पती व कुटुंबातील इतर सदस्यांसोबत त्यांनी आपला वाढदिवस घरी उत्साहात साजरा केला. त्या संस्थेच्या कामाने नेहमीच बाहेर जात असत. शनिवारीही त्या नेहमीप्रमाणे कामासाठी निघून गेल्या. रविवारी सकाळी त्यांच्या अपघाती मृत्यूची माहिती आली. त्यामुळे त्यांच्या पतींना व मुलांना मोठा धक्का बसला आहे. तसेच वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही प्रचंड धक्का बसला आहे.