नागपूर : वने व वन्यप्राणी ही राज्याची अमूल्य संपत्ती आहे व त्यांचे सवर्धन करणे प्रत्येकाचे काम आहे. राज्यात विकासकामे करताना वने व वन्यजीवांना बाधा हाेणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून गुरुवारी वनभवन, नागपूर येथे राज्यातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामावर आधारित वेबिनारचे आयाेजन करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे पर्यावरण, वातावरण बदल व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकाेडकर प्रामुख्याने उपस्थित हाेते. या वेबीनारदरम्यान ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर, नवेगाव-नागझिरा प्रकल्पाच्या उपसंचालक पूनम पाटे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक डाॅ. ज्याेती बॅनर्जी, सह्याद्री प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत यांनी त्यांच्या प्रकल्पामध्ये हाेणाऱ्या विविध कामांची, उपक्रमांची माहिती दिली. डब्ल्आरटीसी, गाेरेवाडाचे संचालक डाॅ. शिरीष उपाध्याय यांनी केंद्राची माहिती दिली. प्रास्ताविक प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश यांनी केले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी आभार मानले. संचालन स्नेहल पाटील यांनी केले.
विदर्भातील वाघ सह्याद्रीला हलविण्याचा प्लॅन
विदर्भातील तिन्ही व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढल्याने या भागात मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. त्यामुळे विदर्भातील वाघ पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व इतर भागात स्थलांतरीत करण्याची याेजना आखली जात आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक डाॅ. रविकिरण गाेवेकर यांनी याविषयी वेबिनारमध्ये माहिती दिली.