लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामान्य माणसासारखे डाक विभागालाही वन्यजीवांचे आकर्षण आहे. याची प्रचिती डाक विभागाने वन्यजीवांवर काढलेल्या डाक तिकिटांवरून येते. भारतीय पोस्टल सेवाच नाही तर इतर देशातील पोस्टल सेवेनेसुद्धा वन्यजीवांप्रती दाखविलेली आत्मीयता त्यांच्यावर काढलेल्या डाक तिकिटांवरून येते. डाक विभागाचे वन्यजीवांवरील प्रेम अनुभवायचे असेल तर कीर्ती दुबेचा संग्रह नक्कीच बघण्याची गरज आहे. वनविभाग १ ऑक्टोबरपासून वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करते. त्यानिमित्त कीर्तीच्या वन्यजीवांवरील डाक तिकिटांच्या संग्रहाचा घेतलेला आढावा.कीर्तीच्या वन्यजीवांवरील डाक तिकिटांच्या संग्रहात पंधराशेवर डाक तिकिटांचा समावेश आहे. ४८ प्रकारच्या थीममध्ये तिने हा संग्रह केला आहे.
२०१५ पासून कीर्ती हा संग्रह करीत आहे. तिच्या या संग्रहाचे दोन वेळा प्रदर्शन लागले आहे. बी.कॉमच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी असलेली कीर्ती उत्तम अॅथलिट आहे. असिस्ट वर्ल्ड रेकॉर्डने तिच्या वन्यजीवांवरील तिकीट संग्रहाची दखल घेतली आहे. कीर्तीच्या डाक तिकिटांमध्ये वनांमधील सर्वच प्राणी, पक्षी, साप, कीटक, फुलपाखरे यांचा समावेश आहे. भारताबरोबरच बहुतांश देशांनी वन्यजीवांवर काढलेली डाक तिकिटेही तिच्या संग्रहात बघायला मिळतात. वन्यजीव सप्ताहानिमित्त तिचा हा संग्रह वन्यजीव प्रेमींसाठी कुतूहलाचा विषय आहे.- संग्रहातील काही वैशिष्ट्ये१) वनविभागाला १०० वर्षे झाली असताना १९६१ मध्ये काढलेले डाक तिकीट.२) जिम कार्बेट पार्कला १०० वर्षे झाल्यानिमित्त १९७६ मध्ये काढलेले डाक तिकीट.३) इंडिया-ऑफ्रिका फोरम समिटनिमित्त गोल्डन टच असलेले इम्बॉक केलेले डाक तिकीट.४) पेंच राष्ट्रीय अभयारण्यावर काढलेले फर्स्ट डे कव्हर.५) नामिबिया देशाने विंचवावर काढलेले डाक तिकीट.६) भरतपूर पक्षी अभयारण्यावर १९७५ मध्ये काढलेले डाक तिकीट.७) श्रीलंकेने पक्ष्यांवर काढलेली मिनिटरशिट.८) पेंग्विनवर काढलेली मिनिटरशिटडाक तिकीट गोळा करण्याचा माझा छंद आहे. या संग्रहात काहीतरी वेगळेपण असावे, यासाठी वन्यजीवांवरील डाक तिकिटांचा संग्रह केला. अनेकांना तो आवडला आहे.कीर्ती मधुप्रसाद दुबे, संग्राहक