लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच व बोर व्याघ्र प्रकल्पासह उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील संरक्षित जंगलात उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू झाली आहे. यासंदर्भात शुक्रवारी पेंच क्षेत्र संचालक कार्यालयात मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
नागपुरातील तिन्ही वन्यजीव क्षेत्रात प्राकृतिक जलस्त्रोतांची संख्या १५० आहे, तर कृत्रिम पाणवठ्यांची संख्या ३५० आहे. वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, ११० जलस्थळांवर सोलर पंप लावण्यात आलेले आहेत, तर ४० ठिकाणी हॅण्डपंपच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या संरक्षित जंगलातील जलस्थळांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज नाही. परंतु एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पाहणी करून गरज पडल्यास टँकरने पाणीपुरवठा सुरू केला जाईल. काही बोरवेलवर अलीकडेच १० सोलर पंप लावण्यात आले आहेत. यासोबतच पेंचमध्ये तोतलाडोह, पेंच नदी आणि लोअर पेंच कालवा आहे. उमरेड-कऱ्हांडलामध्ये गोसी खुर्द कालव्याचे पाणी मिळते, तर बोर व्याघ्र प्रकल्पात बोरधरणावर वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध होते.