परीक्षा मंडळाच्या बैठकीत चौकशी अहवालावर चर्चा : ‘मॉरिस’च्या विद्यार्थिनींबाबत आज फैसला नागपूर : वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेत (जुने मॉरिस कॉलेज) संस्कृत विभागातील विद्यार्थिनींनी प्राध्यापकाविरोधातच केलेल्या पोलीस तक्रारीच्या प्रकरणाचा बुधवारी सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता आहे. यासंबंधात विद्यापीठाने तसेच महाविद्यालयाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. ३ आॅगस्ट रोजी परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर पुढील निर्णय होणार आहे. या प्रकरणात विद्यार्थिनींवर प्रथमदर्शनी अन्याय झाला असून त्यांना दिलासा देण्यात येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तक्रारकर्त्या विद्यार्थिनी एम.ए.(संस्कृत) शेवटच्या वर्षात या संस्थेत शिक्षण घेत आहेत. संस्कृत विभागाचे विभागप्रमुख डॉ. ओमकुमार टोम्पे यांच्याकडून वर्षभर चुकीची वागणूक देण्यात आली, असा आरोप विद्यार्थिनींनी केला होता. आपणास मी परीक्षेत अनुत्तीर्ण करील, अशी सातत्याने धमकी टोम्पे यांच्याकडून देण्यात येत होती. मात्र शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थिनी गप्प बसल्या. परंतु या विद्यार्थिंनींना महाविद्यालयाकडून घेण्यात आलेल्या ‘इंटर्नल’ परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर विद्यार्थिनींनी संस्थेचे संचालक डॉ.भाऊ दायदार यांच्याकडे दाद मागितली. तेथूनही तत्काळ कारवाई न झाल्याने मागील महिन्यात विद्यार्थिनींनी पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर नागपूर विद्यापीठाने या प्रकरणाला गंभीरतेने घेतले असून यासंदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली. यासंदर्भात संस्थेकडूनदेखील अंतर्गत चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. विद्यापीठाच्या चार सदस्यीय समितीचा अहवाल तयार झाला असून तो प्रशासनाला सोपविण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या समितीचा अहवालदेखील विद्यापीठाकडे पोहोचला आहे. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना विचारणा केली असता त्यांनी अहवाल सादर झाले असल्याचे स्पष्ट केले. परंतु अहवालात काय आहे यावर भाष्य करण्यास नकार दिला. ३ आॅगस्ट रोजी परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.(प्रतिनिधी)
वादग्रस्त प्राध्यापकावर कारवाई होणार का ?
By admin | Published: August 03, 2016 2:27 AM