त्या नराधम आरोपीविरुद्ध नव्याने खटला चालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 08:39 PM2018-10-26T20:39:03+5:302018-10-26T20:43:06+5:30
आष्टी तालुक्यातील पांढुर्णास्थित आदिवासी आश्रम शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करणारा नराधम आरोपी राजू ऊर्फ राजकुमार केशव लांडगे (४९) याच्याविरुद्ध आता सत्र न्यायालयामध्ये नव्याने खटला चालविला जाईल. हा खटला निकाली काढण्यासाठी सत्र न्यायालयाला सहा महिन्याची मुदत देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी यासंदर्भात आदेश दिलेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आष्टी तालुक्यातील पांढुर्णास्थित आदिवासी आश्रम शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करणारा नराधम आरोपी राजू ऊर्फ राजकुमार केशव लांडगे (४९) याच्याविरुद्ध आता सत्र न्यायालयामध्ये नव्याने खटला चालविला जाईल. हा खटला निकाली काढण्यासाठी सत्र न्यायालयाला सहा महिन्याची मुदत देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी यासंदर्भात आदेश दिलेत.
लांडगेविरुद्ध या दोन्ही प्रकरणांत वेगवेगळा खटला चालविण्यात आला होता. वर्धा येथील विशेष सत्र न्यायालयाने एका खटल्यात ५ आॅक्टोबर २०१७ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३७६(२)(आय) अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड अशी कमाल शिक्षा सुनावली. दुसऱ्या खटल्यामध्ये ११ जानेवारी २०१८ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३७६(ई) (अत्याचाराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती) अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या दोन्ही निर्णयांविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल करून सत्र न्यायालयामध्ये स्वत:चा बचाव करण्याची पूर्ण संधी मिळाली नाही असा दावा केला. विधी सेवा विभागाकडून पुरेसा अनुभव नसलेला व असक्षम वकील बाजू मांडण्यासाठी देण्यात आला होता. त्यामुळे योग्य बचाव करता आला नाही असे त्याने सांगितले. प्रकरणावरील सुनावणीनंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांना आरोपीच्या दाव्यांत तथ्य आढळून आले. त्यामुळे त्यांनी सत्र न्यायालयाचे दोन्ही निर्णय रद्द केले व या दोन्ही प्रकरणांवर दोषारोप निश्चित करण्याच्या टप्प्यापासून नव्याने खटला चालविण्यात यावा असा आदेश सत्र न्यायालयाला दिला. तसेच, यावेळी आरोपीची बाजू मांडण्यासाठी अनुभवी व सक्षम वकिलाची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश दिलेत. उच्च न्यायालयात आरोपीतर्फे अॅड. शंतनू भोयर तर, सरकारतर्फे अॅड. संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.
अशी आहेत प्रकरणे
आरोपी लांडगे आश्रमशाळा वसतिगृहाच्या नवनिर्मित इमारतीमध्ये चौकीदार होता. तो आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना स्वत:च्या वासनेची शिकार करीत होता. तसेच, तो विद्यार्थिनींना आरडाओरड केल्यास किंवा दुसऱ्याला अत्याचाराची माहिती सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे मुली गप्प राहात होत्या. दरम्यान, एका मुलीमुळे आरोपीच्या राक्षसी कृत्याला वाचा फुटली. त्यानंतर दुसरी मुलगीही धाडस दाखवून पुढे आली. दोन्ही घटना आॅगस्ट-२०१५ मधील आहेत. मुलींच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आले आहेत.