अजित पवारांना सोडून छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता, लवकरच ठोस निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 05:38 IST2024-12-19T05:37:33+5:302024-12-19T05:38:00+5:30

छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत, मंत्रिमंडळात न घेतल्याने समर्थक संतप्त झाले आहेत. काही समर्थकांनी आता भाजपसोबत चला असे जाहीरपणे आवाहन केले आहे. या आवाहनाला ते प्रतिसाद देतील का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.

will chhagan bhujbal leave ajit pawar and join bjp the curiosity in political circles concrete decision likely taken soon | अजित पवारांना सोडून छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता, लवकरच ठोस निर्णय!

अजित पवारांना सोडून छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता, लवकरच ठोस निर्णय!

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ज्येष्ठ नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला करणे सुरूच ठेवले असताना ते अजित पवार यांची साथ सोडतील का याची चर्चा आता सुरू झाली आहे. ते भाजपमधील प्रवेश करतील असा कयास लावला जात आहे.

भुजबळ हे ओबीसी नेते आहेत, त्यांना मंत्रिमंडळात न घेतल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. काही समर्थकांनी आता भाजपसोबत चला असे जाहीरपणे आवाहन केले आहे. या आवाहनाला ते प्रतिसाद देतील का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. लवकरच ते ठोस निर्णय घेतील, अशी शक्यता आहे. भुजबळ मूळ शिवसैनिक, नंतर ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. नंतर शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटात समील झाले.

भाजपला वाटते... फायदाच होईल

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर टोकाची टीका केली तेव्हा भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जरांगेंना प्रत्युत्तर देण्यात भुजबळ पुढे होते. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने 'लोकमत'ला सांगितले, की ते भाजपमध्ये आले तर आम्हाला निश्चितपणे फायदा होईल.

ओबीसींचा एक मोठा नेता आमच्यासोबत आल्याने या समाजात भाजपची पकड अधिक मजबूत होईल. लवकरच बिहारची विधानसभा निवडणूक आहे, तेथील ओबीसी मतदारांमध्ये भुजबळ यांना बऱ्यापैकी मान्यता आहे, त्याचाही फायदा होऊ शकतो.

राजकीय पुनर्वसन कसे असेल...

भुजबळ भाजपमध्ये आले तर त्यांचे राजकीय पुनर्वसन कसे करणार, हा प्रश्न असेल. ते विधानसभेचे सदस्य आहेत, फडणवीस सरकारमध्ये एक मंत्रिपद रिक्त आहे. ते भुजबळ यांना दिले जावू शकते. अर्थात ते भाजपमध्ये गेले तर येवल्याच्या आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा लढून जिंकावे लागेल. त्यांना राज्यात मंत्री न करता केंद्रात मंत्री करणे वा ते शक्य नसेल तर राज्यसभेवर पाठविणे हादेखील एक पर्याय असेल. भुजबळ यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

'मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं, मुझें फेंक ना देना...'

नाशिकमध्ये बुधवारी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक झाली. त्यात बोलताना शेवटच्या श्वासापर्यंत मागासवर्गीयांच्या प्रश्नावर लढा देण्याचा निर्धार भुजबळ यांनी व्यक्त केला. तसचे शेरोशायरी सादर करीत काही संकेतही दिले.

मैं मोसम नहीं हूं, जो पल मे बदल जाऊ मैं इस जमीन से कही और निकल जाऊ में ऊस पुराने जमाने का सिक्का हूं, मुझे फेक ना देना हो सकता तुम्हारे बुरे दिनो में यही सिक्का चल जायेगा..." असे भुजबळ म्हणाले. "कभी डर ना लगा... मुझे फासला देख कर... मैं बढ़ता गया रास्ता देखकर... खुद ही खुद नजदीक.. आती गयी मंजिल... मेरा बुलंद हौसला देखकर" असा शेर म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांनी भुजबळ यांचा जयघोष केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी आहे सख्य... 

भुजबळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निकटचे संबंध आहेत. ओबीसींच्या प्रश्नांवर फडणवीस यांनी अनेकदा त्यांचा सल्ला घेतल्याची उदाहरणे आहेत. ज्या ओबीसींचे प्रश्न मी सातत्याने मांडतो, ते समजून घेण्याची आणि त्यावर निर्णय करण्याची फडणवीस यांची नेहमीच तयारी असते असे कौतुक भुजबळ यांनादेखील आहे.
 

Web Title: will chhagan bhujbal leave ajit pawar and join bjp the curiosity in political circles concrete decision likely taken soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.