CAA : केंद्राचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार का?; अजितदादा म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 11:33 AM2019-12-17T11:33:13+5:302019-12-17T11:44:33+5:30
गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठा वाद सुरू आहे. अनेक राज्यांनी हा कायदा लागू करण्यास मज्जाव केला आहे.
नागपूरः गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठा वाद सुरू आहे. अनेक राज्यांनी हा कायदा लागू करण्यास मज्जाव केला आहे. महाराष्ट्राचीही या कायद्यासंदर्भात संदिग्ध भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या कायद्यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयानंतर विचार करू, असे सूतोवाच केले आहेत. त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा या कायद्याला पाठिंबा द्यायचा का विरोध करायचा, यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याचं अजितदादा म्हणाले आहेत.
राज्य सरकारला यासंदर्भात असलेल्या अधिकारांसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी नागपूर दौऱ्यानिमित्त दरम्यान चर्चा केली जाणार आहे. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेसुद्धा नागपुरातच आहेत, त्यामुळे यासंदर्भात निर्णय बैठकीनंतर घेतला जाईल, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सकाळी विधान भवन परिसरात आयोजित बैठकीत म्हटले आहे.
हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासूनच सुरुवात झाली असून, महाविकास आघाडीचे हे पहिलेच अधिवेशन आहे. या अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे वक्तव्य तसेच नागरिकत्व संशोधन विधेयकावरून भाजपा आक्रमक पवित्रा घेणार आहे. याशिवाय शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी अतिवृष्टी, विकास कामांवरील स्थगिती या मुद्द्यांवरुनदेखील सरकारला घेरण्यात येईल.
(CAA : जामिया हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून 10 जणांना अटक)
(विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी)