नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी १९ जुलै रोजी होत असलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक आ. रणजीत कांबळे यांच्या उपस्थितीत जि.प. व पं.स.च्या सर्व जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विशेष म्हणजे दीड वर्षापूर्वी झालेल्या जि.प.च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करून निवडणूक लढविली होती. यंदाही राष्ट्रवादीला काँग्रेसने बैठकीसाठी आमंत्रित केले होते. पण बैठकीत अपेक्षित तडजोड न झाल्यामुळे काँग्रेस निवडणुकीच्या तयारीला लागली आहे.
जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या गणेशपेठ येथील कार्यालयात जि.प. व पं.स.च्या पोटनिवडणुकीकरिता जिल्हा निवड मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे, आ. राजू पारवे, आ. अभिजित वंजारी यावेळी उपस्थित होते. या वेळी १६ जिल्हा परिषद व ३१ पंचायत समिती सर्कलमध्ये काँग्रेसकडून लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. जिल्हा काँग्रेसने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागितले होते. या बैठकीला किशोर गजभिये, एस.क्यू. जमा, सुरेश भोयर, गज्जू यादव, शकुर नागाणी, प्रकाश वसू, तक्षशिला वागधरे, कुंदा राऊत, बाबा आष्टणकर, हुकूमचंद आमधरे, तुळशीराम काळमेघ, राहुल सिरिया, आशिष मंडपे, राहुल घरडे, भीमराव कडू, आदी उपस्थित होते.
- प्रदेशच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीशी चर्चा
शुक्रवारी काँग्रेसतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निरीक्षकांनी उपस्थित आमदार व पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले. आघाडीच्या संदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या भावना आम्ही प्रदेशाला कळविणार आहोत. शनिवारी प्रदेशाकडून त्यावर निर्णय होईल. त्यानंतर आम्ही राष्ट्रवादीशी चर्चा करू.
- राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस