लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : आरोग्य विभागात कंत्राटी तत्त्वावर गत १४ वर्षांपासून ते आरोग्य सेवेचा किल्ला लढवित आहेत. आता कोविड केअर सेंटर, लसीकरण आणि तपासणीतही आरबीएसके अंतर्गत कंत्राटी डाॅक्टरांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र त्यांना आवश्यक साेईसुविधांसह नाेकरीत कायमस्वरूपी नियुक्तीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या कंत्राटी डाॅक्टरांना न्याय मिळणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २०१३ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) देशभरात राबविला जात आहे. यापूर्वी २००८ पासून शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत ६ ते १८ या वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम होता. त्याअंतर्गत आजपर्यंत हजारो रुग्ण बालकांना जीवनदान मिळाले आहे. तिरळेपणा, जन्मजात मोतिबिंदू, अस्थिव्यंग, मेंदूचे आजार आदी शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. या गंभीर आजारामुळे होणारे मृत्यू आणि अंपगत्वाचे प्रमाण कमी करण्यात या कार्यक्रमामुळे यश आले आहे.
आरोग्य विभागात रिक्तपदांचा बॅकलॉग मोठा आहे. जिल्ह्यातील बहुतांश शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषधनिर्माण अधिकारी यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. अशावेळी आरबीएसकेअंतर्गत कार्यरत कंत्राटी डॉक्टर व कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर निस्वार्थपणे आरोग्यसेवा देत आहे. कोरोना संकटकाळात पुरेशा मनुष्यबळाअभावी आरोग्य व्यवस्था काेलमडली. अशा कठीण प्रसंगात आरबीएसकेचे कंत्राटी डॉक्टर हे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाशी लढत आहे. कोविड केअर सेंटरमध्ये २४ तास रुग्णांवर उपचार करत आहे. या संसर्गजन्य परिस्थितीत प्रत्येक गावागावात सर्व्हे, कोविड लसीकरण, कोविड तपासणीसह मेडिकल कॉलेजमध्येसुद्धा ते आरोग्य सेवा देत आहे. यादरम्यान आरबीएसकेच्या अनेक डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. आरोग्य सेवा पुरविताना कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्याने अनेकांनी आपले नातेवाईकही गमावले. मात्र कोरोना काळात आरोग्य सेवेत खंड पडू दिला नाही. परंतु आरबीएसकेच्या अशा लढवय्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्षच झाले आहे.
.....
२४ तास काम आणि वेतनासाठी थांब
काेराेना संकट काळात रुग्णसेवा देणारे कंत्राटी डाॅक्टर व कर्मचारी यांच्या तुटपुंज्या वेतनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. मागील वर्षी सहा महिने काम केल्यानंतर एक महिन्याच्या वेतनाचा ७५ टक्के प्रोत्साहन भत्ता नाममात्र देण्यात आला. याउलट आता कोविड ड्युटीसाठी केलेल्या नवीन भरतीमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना त्यापेक्षा अधिक मानधन आणि १०० दिवस काम केल्यानंतर सेवेत सामावून घेण्याची हमी शासनाकडून दिल्या जात आहे. परंतु १२ ते १४ वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर उत्तम आरोग्य सेवा देणाऱ्या आरबीएसकेच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा कुणीही वाली नाही. ते अद्यापही कंत्राटी तत्त्वावरच कार्यरत आहे. त्यांना आता तरी सेवेत कायम करावे, असा सूर व्यक्त हाेत आहे.
...
हेसुद्धा काेराेना याेद्धा
गत वर्षभरापासून आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आरबीएसकेचे डॉ. प्रशांत हिवरकर, डॉ. शिशीर गोस्वामी, डॉ. अश्विनी काळे, डॉ. वृषाली श्रीखंडे, स्वाती पाटील, मृणाली नागदेवे, लता लाडेकर, मंगला ठाकरे आदी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णसेवा देत आहेत. मात्र या काेराेना याेद्धयांकडे शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षच आहे.