सभापतींच्या निर्देशाने संभ्रम : टास्क फोर्स समितीची बैठक
लेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणूक जवळ आल्याने प्रशासकीय कामात पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेप वाढला आहे. आता आरोग्य सभापतींनी हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षणात नगरसेवकांचे सहकार्य घेण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे नगरसेवक सर्वेक्षणासाठी फिरणार का? असा संभ्रम निर्माण झाला आहे.
सरकारच्या निर्देशानुसार मनपाच्या आरोग्य विभागातर्फे २७ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षण चार दिवसांत पूर्ण करायचे असल्यामुळे स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने ते पूर्ण करा, असे निर्देश आरोग्य समिती सभापती महेश महाजन यांनी गुरुवारी टास्क फोर्सच्या बैठकीत दिले.
शासकीय विविध उपक्रम वर्षभर सुरू असतात. यात पदाधिकारी व नगरसेवकांचा प्रत्यक्ष सहभाग नसतो. यात वेगळे करण्यासारखे काही नसते. परंतु निवडणुका जवळ आल्याने सर्वच उपक्रमात नगरसेवकांचा सक्रिय सहभाग असतो. असे दर्शविण्यासाठी नगरसेवकांच्या सहकार्याने सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षणात आशा वर्कर यांच्या मदतीला नगरसेवक राहतील का? असा संभ्रम निर्माण झाला आहे.
मनपा मुख्यालयातील टास्क फोर्सच्या बैठकीला महेश महाजन, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, हिवताप व हत्तीरोग अधिकारी दीपाली नासरे, जागतिक आरोग्य संघटनेच्या झोनल समन्वयक डॉ. भाग्यश्री त्रिवेदी आणि सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
सर्वेक्षणासाठी ६ ते ७ वर्ष वयोगटातील मुला-मुलींचे नमुने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे पालकांचे योग्य समुपदेशन करणे आवश्यक आहे, असे संजय चिलकर म्हणाले. हत्तीरोग आजाराचा प्राथमिक संसर्ग ६ ते ७ वयोगटातील मुलांमध्ये आढळून येत असल्यामुळे या मुलांची निवड करण्यात आली आहे.