ब्रिजेश तिवारी
कोंढाळी: अमरावती येथील एका विधवा महिलेला मुलांनी घराबाहेर काढले. भटकत भटकत ही महिला काही दिवसापूर्वी कोंढाळी येथे आली. गत दोन महिन्यापासून या महिलेने कोंढाळीलगतच्या दुधाळा गावातील एसटी प्रवासी निवाऱ्याचा आसरा घेतला आहे. फिरोजा बी असे या महिलेचे नाव आहे. तिचे पती मोहम्मद अनवर हॉटेलमध्ये काम करीत होते. ती घरी शिलाईचे काम करीत होती. पण काही वर्षांपूर्वी पती मोहम्मद अनवर यांचे निधन झाले. फिरोजा बी हिला मोहम्मद फिरोज व मोहम्मद जावेद ही दोन मुले आहेत. दोघांचे लग्न झाले आहे. त्या काही दिवस मुलासोबत राहिल्या. मात्र कौटुंबिक वादामुळे मुलांनी तिला घराबाहेर काढले. यानंतर भटकत ही महिला पायी अमरावती येथून कोंढाळी येथे पोहोचली. सुरुवातीला काही दिवस कोंढाळी एसटी बसस्थानकावर राहिली. तिथे मिळेल ते खाऊन पोटाची भूक भागवली. मात्र दोन महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊननंतर एसटीच्या सेवा बंद झाल्या. बसस्थानक ओस पडले. त्यामुळे तिथे जेवणाची व्यवस्था होत नसल्याने फिरोजा बी हिने नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गालगतच्या दुधाळा गावातील एसटीच्या प्रवासी निवाऱ्याचा आसरा घेतला. गावातील लोक तिला थोडीफार मदत करतात. यातून ती जीवन जगत आहे. ती प्रवासी निवाऱ्यातच चूल पेटवून स्वयंपाक करते. पण आता पावसाळा सुरू होणार असल्याने या महिलेची चिंता वाढली आहे. आपल्याला कुणी शिलाई मशीन दिली तर आपण स्वत:पुरते पैसे कमावू, असा विश्वास तिने व्यक्त केला. त्यामुळे या निराधार महिलेला समाजातील दानदात्यांनी आधार द्यावा, एवढीच अपेक्षा.