लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्टार्टअप्सकडे वळणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना स्टार्टअप्ससाठी दिशा दाखविणारे इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर उभारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ९८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून खा.राकेश सिन्हा हे ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. याशिवाय ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने, प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे, कुलसचिव डॉ.राजू हिवसे हेदेखील उपस्थित होते. यावेळी उद्योजक सत्यनारायण नुवाल यांचा जीवनसाधना पुरस्काराने गौरव करण्यात आला तर चंद्रकांत चन्ने यांना २०२० सालचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
परदेशातून झालेल्या आक्रमणानंतरदेखील आपल्या विद्यापीठांची संस्कृती व ज्ञान कायम आहे. भारत बहुमतवादी नाही तर गुणात्मकतेकडे लक्ष देणारा देश आहे. संख्येच्या आधारावर आम्ही बहुसंख्य किंवा अल्पसंख्य असे भेद निर्माण करत नाही. या पार्श्वभूमीवर सध्याच्या अत्यंत टोकदार अस्मितांच्या काळात देशात सद्भाव निर्माण झाला पाहिजे. हे काम शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून होऊ शकते, असे प्रतिपादन खा.राकेश सिन्हा यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान आदर्श संस्था, आदर्श कर्मचारी, आदर्श विद्यार्थी तसेच इतर पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोनाकाळात विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी काम करणाऱ्या विद्यापीठ समितीचे अध्यक्ष विष्णू चांगदे, सदस्य मनमोहन बाजपेयी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. अभय मुद्गल यांनादेखील सन्मानित करण्यात आले. डॉ. संजय दुधे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले.
तरुणांच्या आत्मकेंद्रीपणावर चिंतन व्हावे : नुवाल
देशातील अनेक तरुण विदेशात अतिशय मौलिक योगदान देत आहेत. परंतु समृद्धी आणि शिक्षण मिळविणारी तरुण पिढी आत्मकेंद्री होत असल्यासारखे दिसते आणि असे होत असेल तर आपण देत असलेल्या शिक्षणात काहीतरी निश्चितपणे चुकते आहे. याचे चिंतन झाले पाहिजे, असे मत सत्यनारायण नुवाल यांनी व्यक्त केले.
यांचा झाला सत्कार
आदर्श अधिकारी :
डॉ.नवीन मुंगळे, सतीश मुरमारे
आदर्श कर्मचारी :
नितीन खरबडे, अरविंद कोठे, गणेश राठोड, संजय घारडे, विजय बिनकर, मनोज मलकापुरे, सारंग गाडगे, मच्छिंद्र काळे, मनोज मेश्राम, गजानन गावळे
उत्कृष्ट विद्यार्थी :
राहुल कविश्वर, प्राची अग्रवाल, संजय घोरमोडे, अनिर्बन मुखर्जी, दीपाली टेकाम, दिलप्रीत कौर विक्रम सिंह सोखी, ध्रुव भार्गव, कृतिका जांगळे, चिन्मय गायधने, साक्षी ओझा