अंबाझरी उद्यानाच्या आसपास ४४ एकरच्या परिसरात पीपीपी तत्वावर हे बांधकाम केले जात आहे. मनपाच्या नियंत्रणातील १९ एकरचे उद्यान साेडता उरलेल्या ही जागा झाडांनीच व्यापली आहे. जानेवारी २०२० मध्ये या कामाला मंजुरी देण्यात आली व मुंबईचा पत्ता असलेल्या गरूडा अम्युझमेंट पार्क या कंपनीला ०.१५ एफएसआयच्या बांधकामासह कंत्राट देण्यात आले. मात्र कामाचे टेंडर कधी झाले व जनसुनावणी न घेता पर्यावरणाशी निगडित प्रकल्पाला मान्यता कशी दिली, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
याशिवाय ग्रीन झाेन म्हणून आरक्षित असल्याने वनक्षेत्राला अधिक हानी हाेणार नाही व पर्यावरणपूरक बांधकाम करण्याच्या अटीवर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. शिवाय उद्यानात नियमित फिरायला येणाऱ्या माॅर्निंग वाॅकर्स व पर्यटकांसाठीही उद्यान खुले राहील, असा विश्वास एमटीडीसीने त्यावेळी दिला हाेता. मात्र वृक्षसंवर्धनासह माॅर्निंग वाॅकर्सना दिलेला शब्दही एमटीडीसीने माेडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंताेष निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे याच प्रकल्पासाठी डाॅ. आंबेडकर सभागृह ताेडण्यात आल्याने त्याचा वेगळा राेष समाजामध्ये खदखदत असल्याचे चित्र आहे.
कंपनीच्या कामावरही संशय
पर्यावरण कार्यकर्त्यांनी काढलेल्या माहितीनुसार एमटीडीसीने कंत्राट दिलेली गरूडा ॲम्युझमेंट पार्क ही कंपनी दाेनच वर्षापूर्वी स्थापन करण्यात आली आहे व कामाचा फारसा अनुभवही नसल्याचे कंपनीच्या वेबसाईटवरून दिसून येते. दुसरीकडे अशाप्रकारे उद्यानात व्यावसायिक पार्क निर्मितीचा एमटीडीसीचा पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे पहिलाच माेठा प्रकल्प अशा नवख्या कंपनीला का दिला, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दाेन वर्षात काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली हाेती पण दीड वर्षात झाडे ताेडण्याशिवाय काही झाल्याचे दिसत नाही.
काय आहे प्रकल्प?
- अंबाझरी उद्यानाच्या ४४ एकरच्या परिसरात व्यावसायिक पार्क निर्मिती हाेत आहे.
- ८० ते १०० काेटी रुपयांचा हा प्रकल्प पीपीपी तत्वावर विकसित केला जात आहे.
- यातून एमटीडीसीला काही न करता दरवर्षी १५० काेटींचा लाभ मिळेल, असे सांगण्यात येत आहे.
- याअंतर्गत उद्यानात सायकल ट्रॅक, ग्रीन जीम व रिक्रिएशनल झाेपड्या उभारणे. ५० दुकानांसाठी ‘अर्बन हट’ची निर्मिती. तसेच मुलांसाठी वाॅटर पार्क, फिश ॲक्वारियम, फूड काेर्ट आदी.
- उद्यानाबाहेरील झाडांनी व्यापलेल्या जागेवर बॅंकेट सभागृह, पार्टी लाॅन, २० खाेल्या व किचनसह रिसाॅर्ट, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम्नॅशियम, टेनिस काेर्ट, कार्ड रूम्स, बॅडमिंटन काेर्ट, लाॅन टेनिस काेर्ट, स्क्वॅश रूम, बार-कम-रेस्टाॅरंट, जुकाझी, स्टीम बाॅथ आदींची निर्मिती हाेणार आहे.