भाजपशी ‘मॅच फिक्सिंग’ नाही, विदर्भात ‘फिप्टी’ मारूच; नाना पटोले यांचा दावा
By कमलेश वानखेडे | Published: March 3, 2023 01:30 PM2023-03-03T13:30:54+5:302023-03-03T13:33:43+5:30
विदर्भातील शेतकरी, शेतमजूर, लहान उद्योजक, तरुणाई विविध प्रश्नांनी त्रस्त, त्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप अपयशी
नागपूर : मी भाजपशी मॅच फिक्सिंग करणारा नाही, तर भाजप विरोधात ताकदीने लढणारा आहे. नागपूर, अमरावती पाठोपाठ कसब्यातही निकाल दिला आहे. सध्या भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भातच भाजपला धक्का देऊ. विधानसभेच्या किमान ५० जागा जिंकून दाखवू, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकमतशी बोलताना केला.
कसबा- चिंचवड निवडणुकीच्या निकालानंतर पटोले लोकमतशी बोलताना म्हणाले, विदर्भ एकेकाळी काँग्रेसचा गड होता. मात्र, काही चुकांमुळे, अंतर्गत गटबाजीमुळे भाजपने आपली पकड मजबूत केली. विदर्भातील शेतकरी, शेतमजूर, लहान उद्योजक, तरुणाई विविध प्रश्नांनी त्रस्त आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप अपयशी ठरली आहे. त्यामुळे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखे दिग्गज नेते असूनही भाजपचा जनाधार घटला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ, नागपूर शिक्षक मतदारसंघ, अमरावती पदवीधर मतदारसंघात सामान्य कार्यकर्ते मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. भाजपचा गड ढासळण्यास सुरुवात झाली असून लोकसभा व विधानसभेत तो उध्वस्त झालेला दिसेल. भाजपचे मोठमोठे नेते यावेळी पराभूत होतील, असा दावाही पटोले यांनी केला.
येत्या निवडणुकीतही जमिनीवर काम करणाऱ्या सक्षम कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाईल. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या, पक्षाचे कार्यक्रम राबविणारे नेते व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन उमेदवार ठरविले जातील. जनतेचा कलही विचारात घेतला जाईल. मी चुकीचे उद्योग करीत नाही. त्यामुळे माझ्यावर कुणीही ईडी, सिबीआयचा दबाव आणू शकत नाही. मी दबावापुढे झुकणाराही नाही. त्यामुळे भाजप विरोधात ताकदीने लढू व या लढ्यात विदर्भातील जनता तेवढ्याच ताकदीने साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विदर्भात नागपूरसह लोकसभेच्या ७ जागा जिंकणार
- लोकसभा निवडणुकासाठी काँग्रेसने विदर्भात तयारी सुरू केली आहे. गेल्यावेळी राज्यात काँग्रेस एकच जागा जिंकली होती. यावेळी विदर्भात किमान ६ ते ७ जागा जिंकू. नागपुरातही यावेळी काँग्रेसचा झेंडा फडकलेला दिसेल, असा दावाही पटोले यांनी केला.
मार्चनंतर जिल्हानिहाय दौरे, बैठका
- विदर्भ बांधणीचा रोडमॅप तयार आहे. मार्चनंतर विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांचा दौरा केला जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन आढावा घेतला जाईल. स्थानिक पातळीवर असलेले नेत्यांमधील मनभेद दूर करून त्यांना पक्षासाठी एकत्र केले जाईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.