नागपूर : देशासमोर रोजगार निर्मितीचे मोठे आव्हान आहे. त्यामुळेच पंतप्रधानांनी माझ्यावर विश्वास टाकून लघू व मध्यम उद्योग खाते दिले आहे. या विभागात काम करीत असताना ग्रामीण भाग व कृषी क्षेत्रात रोजगारनिर्मितीला माझे प्राधान्य असेल, असे गडकरी यांनी सांगितले. अद्याप मी निश्चित ‘टार्गेट’ ठरविलेले नाही. मात्र रोजगारनिर्मितीचे या वर्षीचे आकडे नक्कीच बदललेले दिसतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.
ते म्हणाले, देशाच्या विकासात या उद्योगांचा मोठा वाटा आहे. एका अर्थाने हे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणाच आहेत. या उद्योगांवर देशाचा विकासदर अवलंबून आहे. या विभागांमध्ये कामाची प्रचंड संधी आहे. या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास व ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल.
या खात्याचा व्याप खूप मोठा आहे. या उद्योगांच्या उत्पादनांची निर्यात वाढली पाहिजे, असे सांगून गडकरी म्हणाले की, अद्याप मी निश्चित ‘टार्गेट’ ठरविलेले नाही. मात्र रोजगारनिर्मितीचे या वर्षीचे आकडे नक्कीच बदललेले दिसतील.मागील पाच वर्षांत देशातील महामार्गांच्या बांधकामाचा वेग वाढला आहे. सद्य:स्थितीत महामार्गांच्या बांधकामाचा वेग ३२ किलोमीटर दर दिवस असा आहे. सोबतच देशाच्या लोकसंख्येइतकी म्हणजे १२५ कोटीझाडे महामार्गांच्या कडेला लावण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली.
सिंचन प्रकल्प पूर्ण करणारमहाराष्ट्रात सिंचन वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी बळीराजांतर्गत सुरू असलेले १०८ तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत असलेल्या २६ सिंचन योजना पूर्ण करण्यावर भर असेल. मी त्या खात्याचा मंत्री नसलो तरी हे सर्व प्रकल्प पूर्ण होतील, याकडे लक्ष देईन. निधीची कुठलीही कमतरता भासणार नाही, असे गडकरी म्हणाले.
पुढील वर्षीपर्यंत गंगा निर्मलगंगा नदीच्या स्वच्छतेचे काम वेगाने सुरू आहे. ती कामे पूर्ण होतीलच. बहुतांश कामांचे वाटप झाले आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत गंगा अविरल व निर्मल होईल. मी त्या खात्याच्या मंत्र्यांना पूर्ण सहकार्य करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.