लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राज्याचे हेवीवेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात काँग्रेसला चमत्काराची अपेक्षा आहे. मात्र बावनकुळे यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामाची पुण्याई येथे भाजपचे उमेदवार टेकचंद सावरकर यांना तारणार का, याकडे राजकीय पोलपंडितांचे लक्ष लागले आहे.कामठीत तिकीट वाटपावरून भाजपमध्ये झालेला हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा राज्याने अनुभवला. बावनकुळे यांना ४ आॅक्टोेबर रोजी भाजपने तिकीट नाकारल्यानंतर काँग्रेसच्या गोटात उत्साह संचारला. यानंतर भाजपची प्रचार यंत्रणा दोन दिवस झोपी गेली होती. मात्र बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय केले.गावागावात पदयात्रा आणि सभा घेत भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘ऊर्जा’ दिली आहे. कामठीची जागा भाजपचे पूर्व विदर्भाचे प्रचार प्रमुख म्हणून बावनकुळे यांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे येथे भाजपचे सावरकर विजय झाले तरी तो बावनकुळे यांचा विजय असेल, असे लोकमत चमूने या भागाचा दौरा केला असता जाणवले.कॉँग्रेसने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांना बावनकुळे यांच्या विरोधात उतरविण्याचे सुरुवातीपासूनच निश्चित केले होते. तिकीट वाटपानंतर पक्षात झालेली बंडखोरी शमविण्यातही काँग्रेसला यश आले. आता बावनकुळे थेट उमेदवार नसल्याने येथे कॉँग्रेसला चमत्काराची अपेक्षा आहे.कामठीत कोट्यवधींची विकास कामे झाली असताना बावनकुळे यांना भाजपने उमेदवारी का नाकारली, हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा करीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी भाजप नेत्यावर तोफ डागली आहे. वासनिक यांनी कामठी तर कमलनाथ यांनी मौदा येथील जाहीर सभेत मतदारांना हा सवाल करीत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.टेकचंद सावरकर हे बावनकुळे यांनी मतदार संघात केलेल्या विकास कामांना प्रचाराचा प्रमुख मुद्दा करीत मतदारापर्यंत पोहोचत आहे. तर, भाजपची ही जागा राखण्यासाठी सुलेखाताई कुंभारे प्रचंड परिश्रम घेत आहेत. इकडे भोेयर यांनी बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी, मतदार संघातील प्रमुख शहरातील नागरी सुविधांचा अभाव आणि बावनकुळे यांना भाजपने उमेदवारी का नाकारली, असा प्रचाराचा मुद्दा केला आहे.दलित, मुस्लीम आणि कुणबी समाजाच्या मतावर भिस्त असलेल्या या मतदार संघात वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि आॅल इंडिया मजलिस-ए-इतेहादुल मुसलमिन (एआयएमआयएम) असे तिहेरी आवाहन काँग्रेसपुढे असल्याने पारंपरिक व्होट बँक सांभाळताना कस लागणार आहे. बसपाने येथे प्रफुल मानके, वंचित बहुजन आघाडीने राजेश काकडे तर ‘एआयएमआयएम’ने शकीबूर रहमान अतिकूर रहमान यांना मैदानात उतरविले आहे.कामठी शहरात या तिन्ही पक्षाच्या उमेदवारामुळे काँग्रेसला फटका बसण्याचा तर्क भाजपकडून लावण्यात आला आहे. इकडे बावनकुळे यांचे नाराज समर्थकच भोयर यांना तारतील, असा दावा काँग्रेस नेत्याकडून केला जात आहे.
Maharashtra Election 2019; बावनकुळेंच्या कामाची पुण्याई सावरकरांना तारणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:01 PM
राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामाची पुण्याई येथे भाजपचे उमेदवार टेकचंद सावरकर यांना तारणार का, याकडे राजकीय पोलपंडितांचे लक्ष लागले आहे.
ठळक मुद्देकाँग्रेसला चमत्काराची अपेक्षा बसपा, वंचितचीही भूमिका निर्णायक