सुमेध वाघमारे, नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर (आरएसटी) हॉस्पीटल गेल्या ५० वषार्पासून सेवारत आहे. १० बेडचे अतिदक्षता विभाग सुरु झाल्याने रुग्णांना अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. या हॉस्पिटलचा २५० बेड क्षमतेची प्रस्तावित नवीन इमारत उभारण्यास शासन मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
‘कॅन्सर रिलिफ सोसायटी’ संचालीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये 'स्वर्गीय श्रीमती मीनाताई सिताराम जवादे' यांच्या स्मृती प्रित्यर्थ उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी १० बेडच्या मॉड्यूलर अतिदक्षता विभागाचे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, कॅन्सर रिलिफ सोसायटीचे सचिव डॉ. अनिल मालवीय आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कॅन्सरवरील उपचाराचा कालावधी लांब व खर्चीकही असतो. या हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. गेल्या ५० वर्षांचा रुग्ण सेवेचा हा प्रवास गौरवास्पद आहे. नवीन इमारतची स्थिती बघून जिल्हाधिकारी यांनी रोड मॅप तयार करावा, अशी सूचना करत ही इमारत उभारण्यास राज्य, केंद्र शासनाच्या योजना व उपक्रमाद्वारे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. डॉ. मालवीय यांनी स्वागतपर भाषण केले. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिदक्षता विभागाची पाहणी केली. आॅइल अँड नॅचरल गॅस कॉपोर्रेशन (ओएनजीसी) यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधीतून आणि राहुल सिताराम जवादे यांच्या सहकायार्तून अतिदक्षता विभाग उभारण्यात आला.