योगेश पांडे - नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरू येथे होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संघाच्या नवीन सरकार्यवाहांची निवड करण्यात येणार आहे. विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी हे या पदी कायम राहतात, की त्यांच्याजागी इतर पदाधिकाऱ्याची वर्णी लागते हा प्रश्न अनुत्तरित आहे. देशातील सध्याची स्थिती लक्षात घेता या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नागपूरबाहेर प्रथमच सरकार्यवाहांची निवड होणार आहे.संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. परंतु यात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. या सभेत सरकार्यवाह या पदाची निवड होणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. सरकार्यवाहांची निवड झाल्यानंतरच संघाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात येते. सरकार्यवाहांची निवड निवडणूक प्रक्रियेद्वारे होते. या पदासाठी आतापर्यंत एकदाही मतदान करण्याची वेळ आलेली नाही. निवड करून सरकार्यवाहांच्या नावाची घोषणा करण्यात येते. १९ व २० मार्चच्या सभेतदेखील असेच व्हावे, असा संघाचा प्रयत्न आहे.२०१२, २०१५ व २०१८ मध्ये या पदावर भय्याजी जोशी यांची फेरनिवड झाली होती. जोशी यांचे प्रशासनकौशल्य पाहता त्यांचीच फेरनिवड व्हावी यासाठी संघातील बरेच धुरीण आग्रही आहे. परंतु गेल्या तीन वर्षांतील संघाने घेतलेली भूमिका आणि संघप्रणीत संघटनांचे वाढते प्राबल्य यामुळे यंदा संघाकडून धक्का देण्यात येण्याची शक्यता आहे. तुलनेने तरुण असलेले सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, डॉ. कृष्णगोपाल यांच्यासह इतर सहसरकार्यवाहांच्या नावाचादेखील विचार होण्याची प्रबळ शक्यता वर्तविण्यात येत आहे.
असा राहिला सरकार्यवाहपदाचा इतिहास१९२९- आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी बालाजी हुद्दार यांची सरकार्यवाह म्हणून नियुक्ती केली१९५० - संघाच्या पहिल्या अ.भा. प्रतिनिधी सभेत प्रभाकर बळवंत उपाख्य भय्याजी दाणी यांची सरकार्यवाह म्हणून निवड१९५६ - एकनाथ रानडे यांच्याकडे सरकार्यवाहपदाची जबाबदारी१९६२ - प्रभाकर बळवंत उपाख्य भय्याजी दाणी यांची सरकार्यवाह म्हणून निवड१९६५ -बाळासाहेब देवरस यांची सरकार्यवाह म्हणून निवड१९७९ - रज्जूभय्या यांची सरकार्यवाहपदी निवड१९८७ - हो. वे. शेषाद्री हे संघाचे सरकार्यवाह झाले२००० -डॉ. मोहन भागवत यांची सरकार्यवाहपदी निवड२००९ - सुरेश उपाख्य भय्याजी जोशींची सरकार्यवाहपदी निवड२०१८ - सलग चौथ्यांदा सरकार्यवाहपदी सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांची निवड
सरकार्यवाहच मुख्य प्रशासकसंघाच्या संविधानानुसार संघाचे सर्वोच्च अधिकारी हे सरसंघचालक नाहीत, तर सरकार्यवाह हे आहेत. सरसंघचालक हे संघाचे मार्गदर्शक असतात, तर सरकार्यवाह हे निवडून आलेले असतात. संघाचा विस्तार, संघाची विविध कार्य इत्यादींवर सरकार्यवाह यांचे थेट लक्ष असते.