लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अलीकडच्या काळात रेल्वेचे मार्ग ब्रॉडगेज करण्यात येत आहेत. नागपुरातील वैभव असलेल्या मोतीबाग डिझल लोकोशेडमध्येही बोटावर मोजता येईल इतक्याच डिझेल इंजिनची देखभाल सुरू आहे. येथील कर्मचाऱ्यांच्याही इतरत्र बदल्या करण्यात येत असून हे लोकोशेड बंद होणार की काय, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.भारतीय रेल्वेत सर्वत्र नॅरोगेज होते. आधुनिक काळात नॅरोगेजऐवजी आता सर्वत्र ब्रॉडगेज मार्ग होत आहेत. कधी काळी वाफेवर चालणारे इंजिन, त्यानंतर डिझेल आणि आता विजेवर धावणारे इंजिन वापरण्यात येत आहे. त्यामुळे डिझेल इंजिन मागे पडत आहेत. नागपूर विभागात नॅरोगेज आणि डिझेल इंजिन मोठ्या प्रमाणात असल्याने मोतीबाग डिझेल लोकोशेड सुरू झाले. येथे नॅरोगेज इंजिनच्या देखभाल-दुरुस्तीची कामे व्हायची. काळाच्या ओघात नॅरोगेज रेल्वे इतिहासजमा झाली. त्यामुळे मोतीबाग शेडला उतरती कळा लागली. आता केवळ नागपूर-नागभीड हा एकच नॅरोगेज मार्ग शिल्लक आहे. लोकोशेडमधील काम कमी झाल्याने २०१५-१६ मध्ये कोट्यवधींचा खर्च करून ब्रॉडगेज डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले. शेडला २५ ब्रॉडगेज डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीची मान्यता असून, हळूहळू शेडची क्षमता ४० लोकोपर्यंत नेण्याची ग्वाही देण्यात आली होती. येथे इलेक्ट्रिक, मेकॅनिक, स्टोअर, व्यवस्थापन हे विभाग असले तरी कामगारांची संख्या केवळ २५० वर आली आहे. आज महिन्याकाठी सरासरी केवळ ११ नॅरोगेज इंजिन आणि १४ ब्रॉडगेजचीच देखभाल-दुरुस्ती होत आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना इतरत्र हलविले जात आहे. त्याविरोधात कामगारांनी आंदोलनही उभारले होते. तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी शेड बंद होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली होती. परंतु आता मोतीबाग लोकोशेडमधील कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येत असल्यामुळे हे लोकोशेड बंद होणार की काय, अशी चर्चा होत आहे.कामगारांची बदलीमोतीबाग लोकोशेडमध्ये १० ते १५ वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या कामगारांना अपग्रेड करून त्यांची गोंदियाला बदली करण्यात आली आहे. महिनाभरात नवीन जागी रुजू व्हा, अन्यथा बढती रद्द करण्यात येईल, असा इशारासुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात आला असल्याची माहिती आहे.
नागपुरातील वैभव मोतीबाग डिझेल लोकोशेड बंद होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 9:52 PM
अलीकडच्या काळात रेल्वेचे मार्ग ब्रॉडगेज करण्यात येत आहेत. नागपुरातील वैभव असलेल्या मोतीबाग डिझल लोकोशेडमध्येही बोटावर मोजता येईल इतक्याच डिझेल इंजिनची देखभाल सुरू आहे. येथील कर्मचाऱ्यांच्याही इतरत्र बदल्या करण्यात येत असून हे लोकोशेड बंद होणार की काय, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
ठळक मुद्देकामगारांना पाठविताहेत इतरत्र : ब्रॉडगेज इंजिनचे काम सुरू करण्याची गरज