- कमलेश वानखेडेनागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरातून पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळेल की नाही, याबाबतच्या शंकाकुशंकांना आता पूर्ण विराम लागला आहे. गडकरी हे नागपुरातूनच लढतील, असे स्पष्ट करीत नागपुरात भाजपला ६५ टक्क्यांवर मते मिळतील, असा दावा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केला.
नागपूर लोकसभेचे भाजपचे निरीक्षक खा. मनोज कोटक व माजी खासदार अमर साबळे हे गुरुवारी नागपुरात आले होते. भाजप कार्यालयात शहरातील ७० प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात आले होते. या बैठकीत शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्यावतीने भूमिका मांडत नितीन गडकरी हेच उमेदवार म्हणून हवे असल्याचे सांगितले होते. त्या पाठोपाठ शनिवारी बावनकुळे यांनीही गडकरी हेच उमेदवार असतील, असे स्पष्ट केले. बावनकुळे म्हणाले, गडकरी यांच्याबाबत संब्रण पसरविणारा एक व्हिडिओ चिटिंग करून व्हायरल केला जात आहे. त्यासंदर्भात आम्ही कायदेशीर नोटीस बजावली आहे. गडकरी यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वावर विस्वास ठेवत देश विकासासाठी काम केले आहे. ते नागपुरातून लढतील व मोठ्या फरकाने जिंकतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. वर्धा लोकसभेतून आपल्या नावाची चर्चा असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता वर्धा लोकसभेची आपला काहिही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवनित राणांचा पक्षप्रवेश नाही- ४ मार्च रोजी नागपुरात आयोजित कार्यक्रमासाठी भाजपच्या सर्व सहकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. खा. नवनित राणा या देखील सहभागी होतील. पण त्याठिकाणी पक्ष प्रवेशाचा सोहळा नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
ते धनुष्यबाण व घड्याळ्यावर लढतील- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उमेदवार धनुष्यबाळ चिन्हवर तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उमेदवार राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढतील. त्यांचे उमेदवार भाजपच्या कमळवर लढण्याचा प्रश्नच नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
कदमांच्या वक्तव्यावर शिंदे निर्णय घेतील- भाजप छोटे पक्ष संपवत आहे, या शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता बावनकुळे म्हणाले, कदम यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. त्यांचे व्यक्तिगत मत हे महायुतीचे मत होऊ शकत नाही. पण शेवटी महायुतीला धोका होणार नाही, याची काळजी प्रत्येकालाच घ्यावी लागेल. सहकाही पक्षांना भाजपने ताकदच दिली आहे. अटलबिहारी वाजपेयींनी ३६ पक्षांना सोबत घेत सरकार चालविले. राज्यातही सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांना मंत्रीपदे दिली होती, याची आठवणही बावनकुळे यांनी करून दिली.