नागपूर विद्यापीठ : व्यवस्थापन परिषदेत निर्णय होण्याची शक्यतानागपूर : आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंच्या दैनिक भत्त्यात वाढ होण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेत निर्णय होण्याची शक्यता आहे. खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांना रुपये २५० इतका दैनिक भत्ता मंजूर करण्यात यावा अशी वित्त व लेखा समितीकडून शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात शनिवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शारिरीक शिक्षण विभागात आजच्या तारखेत आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत विद्यापीठाद्वारे सहभागी होणाऱ्या खेळाडूंना दैनिक १५० रुपये तर प्रशिक्षक व व्यवस्थापक यांना १६० रुपये इतका भत्ता देण्यात येतो. मात्र प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडू, व्यवस्थापक व प्रशिक्षक यांना दैनिक भत्ता मंजूर करण्यात येत नव्हता. त्यांना ‘रिफ्रेशमेंट’साठी प्रतिदिवशी ५० रुपये खर्च मंजूर करण्यात येतो. शारीरिक शिक्षण मंडळाने प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्यांना प्रतिदिवशी २५० रुपये भत्ता मंजूर करण्याची शिफारस केली आहे. वित्त व लेखा समितीनेदेखील अशीच शिफारस केली आहे. या दरवाढीमुळे विद्यापीठाच्या खर्चात वाढ होणार असल्याने याला व्यवस्थापन परिषदेची मान्यता प्राप्त झाल्यानंतर २०१५-१६ पासून ती लागू करण्यात यावी, अशी शिफारसदेखील समितीने केली होती. हा भत्ता मंजूर केल्यास विद्यापीठाच्या खर्चात वाढ होईल असे वित्त व लेखा विभागाचे मत आहे. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेत यावर शनिवारी चर्चा झाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)
खेळाडूंच्या भत्त्यात होणार वाढ?
By admin | Published: January 30, 2015 12:50 AM