राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : राज्य शासनाने चालू हंगामात आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून रामटेक तालुक्यात पाच ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू केले. या पाचही खरेदी केंद्रांवर एकूण २,२८९ शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी ऑनलाईन नाेंदणी केली. आजवर यातील केवळ ५४६ शेतकऱ्यांकडील धानाचे माेजमाप करण्यात आले असून, १,७४३ शेतकऱ्यांना त्यांचा नंबर येण्याची प्रतीक्षा कायम आहे. यात सातबारा स्वीकारूनही १,५३६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नाेंदणी करण्यात आली नाही. ३१ मार्च राेजी ही खरेदी बंद करण्यात येणार असल्याची शक्यता असल्याने १३ दिवसात ही खरेदी पूर्ण हाेईल काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
हिवराबाजार येथील खरेदी केंद्रावर ४४७ शेतकऱ्यांकडून सातबारा घेण्यात आला असून, १४२ शेतकऱ्यांनी नाेंदणी करण्यात आली. यात १६ शेतकऱ्यांचे सातबारा रद्द ठरवण्यात आला तर, २८९ शेतकऱ्यांची नाेंदणी करण्यात आली नाही. शिवाय, १११ शेतकऱ्यांकडील धान खरेदी करण्यात आला. महादुला केंद्रावर ७६१ शेतकऱ्यांचे सातबारा घेण्यात आले. यातील २८६ शेतकऱ्यांची नाेंदणी करण्यात आली असून, ३४ जणांचे सातबारा रद्द ठरवण्यात आले. येथे ४४१ शेतकऱ्यांची नाेंदणी अद्याप करावयाची आहे.
भाेंदेवाडा (डाेंगरी) केंद्रावर १९० शेतकऱ्यांनी सातबारा दिला. यातील ४४ शेतकऱ्यांची नाेंदणी करण्यात आली असून, २६ शेतकऱ्यांकडील धानाचे माेजमाप करण्यात आले. बेलदा केंद्रावर ३४२ शेतकऱ्यांचे सातबारा स्वीकारण्यात आले. यातील केवळ १८ शेतकऱ्यांची ऑनलाईन नाेंदणी करण्यात आली असून, २३३ शेतकऱ्यांची नाेंदणी व्हायची आहे. शिवाय, ७४ शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करण्यात आली. बांद्रा येथील केंद्रावर सर्वाधिक ६३० शेतकऱ्यांनी सातबारा दिले. यातील १८ शेतकऱ्यांची नाेंदणी करण्यात आली असून, ५०८ शेतकऱ्यांची नाेंदणी करणे बाकी आहे. यातील ७५ शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करण्यात आली.
या धान खरेदीमध्ये आदिवासी विकास महामंडळाचे नियाेजन चुकल्याचा आराेप काही जाणकार शेतकऱ्यांनी केला आहे. महामंडळाने पणन महासंघासारखे नियाेजन करायला हवे हाेते, असेही त्यांनी सांगितले. धान खरेदी बंद केल्यास नाेंद न झालेल्या १,५३६ शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कमी किमतीत व्यापाऱ्यांना धान विकावा लागणार आहे. त्यांच्यावर ही वेळ आदिवासी विकास महामंडळाने आणल्याचा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे.
...
खरेदीचा वेग संथ
या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडील सातबारा स्वीकारण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांची ऑनलाईन नाेंदणी केली. यात तालुक्यातील २,२८९ शेतकऱ्यांचे सातबारा आदिवासी विकास महामंडळाला प्राप्त झाले. शासनाने नाेव्हेंबरमध्ये धानाची खरेदी सुरू केली असली तरी रामटेक तालुक्यात ती डिसेंबरनंतर सुरू करण्यात आली. यातील एक केंद्र फेब्रुवारीमध्ये सुरू करण्यात आले. धान खरेदीचा वेगही सुरुवातीपासून संथ हाेता. त्यामुळे तीन महिन्यात २,२८९ केवळ ५४६ शेतकऱ्यांकडील धानाचे माेजमाप करण्यात आले. या केंद्रावर २६० शेतकऱ्यांकडील धानाचे माेजमाप करण्यात आले.
...
३१ मार्चपासून खरेदी बंद?
शासनाने आधीच धान खरेदीला विलंब केला. त्यातच गाेदामांमध्ये धानाची पाेती ठेवायला जागा नसल्याचे सांगून महिनाभर धान खरेदी कंद ठेवण्यात आली. गाेदामातील पाेत्यांची उचल केल्यानंतर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून खरेदीला पुन्हा सुरुवात करण्यात आली. त्यातच ही खरेदी ३१ मार्चपर्यंतच सुरू राहणार असल्याची माहिती पणन महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. ही खरेदी बंद झाल्यास आदिवासी विकास महामंडळ उरलेल्या १३ दिवसामध्ये १,७४३ शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करणार कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.