कोळसा वखारींना कमी किमतीत जमीन वाटपनागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ६ जानेवारी २०१२ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार तडाळी औद्योगिक परिसरातील जमिनीचा दर औद्योगिक उपयोगासाठी १७५ रुपये, तर व्यापार व व्यावसायिक उपयोगासाठी ३५० रुपये प्रति चौरस मीटर असा ठरविण्यात आला आहे. असे असतानाही महामंडळाने ३६ कोळसा वखारींना १७५ रुपये प्रति चौरस मीटर दराने जमीन वाटप केले आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास आणि चांगली किंमत मिळविण्यासाठी येथील जमीन व्यावसायिक व इतर उपयोगाकरिता देण्यास महामंडळ तयार आहे काय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने करून यावर २१जानेवारीपर्यंत उत्तर मागितले आहे.यासंदर्भात चंद्रपूर येथील समाजसेवक राजीव कक्कड यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. कोळसा वखार चालविणे व्यापार आहे. असे असतानाही महामंडळाने कोळसा वखारींना १७५ रुपये प्रति चौरस मीटर दराने जमीन वाटप केल्यामुळे शासनाचे ४.९२ कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. तसेच केंद्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी तडाळी व इतर औद्योगिक परिसरात नवीन उद्योग उभारण्यास प्रतिबंध केला आहे. या बाबी लक्षात घेता तडाळी येथे औद्योगिक उपयोगाच्या दराने जमीन वाटप करण्याचे काहीच औचित्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट करून वरीलप्रमाणे विचारणा केली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २००९ मध्ये काढलेल्या सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण निर्देशांकात चंद्रपूर चौथ्या क्रमांकावर आहे. यामुळे केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने १३ जानेवारी २०१० रोजी अधिसूचना काढून चंद्रपूर, तडाळी, घुग्गुस व बल्लारशाह औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग उभारण्यावर बंदी आणली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अवधूत पुरोहित यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)
तडाळी एमआयडीसीतील जमीन वाटपावर पुनर्विचार करणार काय? हायकोर्टाची विचारणा :
By admin | Published: January 11, 2016 2:57 AM