अधिकाऱ्यांची बैठक : पुढील आठवड्यात कामाला सुरुवातनागपूर : मेट्रो रेल्वेचे वर्धा मार्गावरील काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या मार्गावरील पथदिव्यांचा कामात अडसर निर्माण झाल्याने प्राईड हॉटेल ते मुंजे चौकादरम्यानचे १५६ पथदिवे रस्त्यांच्या कडेला हलविले जाणार आहेत. या संदर्भात नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. १५६ पथदिवे आणि चार हायमास हलविण्याचा खर्च एमएमआरसीएल करणार आहे. या कामासाठी त्यांनी दीड कोटी मनपाला दिले आहेत. कामावर तीन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पथदिवे बसविण्यासाठी फूटपाथची जागा वापरण्यात येणार नाही. पथदिवे कुठे बसवायचे यासाठी अधिकाऱ्यांनी या मार्गाची पाहणी केली असून जागा निश्चित झाली आहे. पुढील आठवड्यात या कामाला सुरुवात होणार आहे. मेट्रो प्रकल्पात मनपाचा पाच टक्के वाटा आहे. हा वाटा जमिनीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मेट्रो रेल्वेला कास्टिंग यार्ड,मेट्रो स्टेशन्स व इतर सुविधा निर्माण करण्यासाठी मनपा जागा देणार आहे. जयताळा, खोवा बाजार, सीताबर्डी , गड्डीगोदाम, अंबाझरी व झिरोमाईल आदी ठिकाणच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.(प्रतिनिधी)
मेट्रोच्या कामात बाधा ठरणारे पथदिवे हटविणार
By admin | Published: September 28, 2015 3:21 AM