लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री शपथ घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळात नितीन गडकरी यांच्याकडे आणखी नव्या मंत्रालयांची जबाबदारी येणार का, यासंदर्भात उत्सुकता वाढली आहे. कार्यकर्त्यांकडून विविध कयास लावण्यात येत असून गडकरींची जबाबदारी वाढेल, असा विश्वास ते व्यक्त करीत आहेत.२०१४ पासून गडकरी यांनी भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा तसेच गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. सर्वच विभागांत कामांनी ‘सुपरफास्ट’ वेग घेतला. केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री अशी गडकरींची देशभरात ओळख निर्माण झाली. इतकेच काय राजकीय वातावरण तापले असताना संसदेत विरोधकांनीदेखील गडकरी यांची प्रशंसा केली. नवीन मंत्रिमंडळात गडकरी यांच्याकडे आहेत तीच खाती ठेवण्यात येतात की आणखी नवी खाती देण्यात येतील, यासंदर्भात चर्चांना उधाण आले आहे. गडकरींकडे कृषी खातेदेखील देण्यात यावे, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. यासंदर्भात गडकरी यांना विचारणा केली असता मंत्रालय कुठले मिळेल, याचा निर्णय सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्ष घेईल. माझ्याकडे जी जबाबदारी येईल ती निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडून देशाला विकासमार्गावर नेण्यास मी कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
भाजपाची आज बैठकदरम्यान, शहर भाजपाची गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्या सत्कारासंदर्भात यात चर्चा करण्यात येणार आहे. शपथविधीअगोदर ही बैठक होईल. शपथविधी झाल्यानंतर भाजपाच्या शहर कार्यालयासमोर जल्लोष करण्यात येणार आहे. या बैठकीत आमदार, शहर कार्यकारिणीचे सदस्य, मंडळ व आघाडी अध्यक्ष तसेच महामंत्री सहभागी होतील, अशी माहिती प्रचार प्रमुख चंदन गोस्वामी यांनी दिली.
नागपूरकरांची शपथविधीला उपस्थितीदरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला नागपुरातील काही मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ.विकास कुंभारे, आ.सुधाकर देशमुख हेदेखील शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.