नागपूर : साई बाबांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र शास्त्रींविराेधात साईभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एकतर असे वक्तव्य देणे बंद करा किंवा चर्चेस तयार व्हा आणि हिंमत असेल तर तमाम साईभक्तांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करा, असे आव्हान साई चरित्र अभ्यासक नरेंद्र नाशिरकर यांनी बुधवारी दिले.
धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्यावरून बुधवारी राज्यभर साईभक्तांकडून निषेध आंदाेलन करण्यात आले. या साखळीत नागपुरातही वर्धा राेडवरील साई मंदिरासमाेर राजू जैस्वाल यांच्या नेतृत्वात निषेध आंदाेलन करण्यात आले. धीरेंद्र महाराजाविराेधात तीव्र नारेबाजी यावेळी करण्यात आली. असे आक्षेपार्ह वक्तव्य करीत असतानाही सरकारकडून कारवाई केली जात नसल्याने भक्तांमध्ये खदखद व्यक्त हाेत आहे.
नाशिरकर म्हणाले, साईबाबा संत हाेते आणि अवतारी पुरुष हाेते. देश-विदेशातून लाखाे भक्त माेठी आस घेऊन त्यांच्या दरबारात येतात. त्यांनी सांगितले, दत्त संप्रदायाचा १३५० मध्ये लिहिलेला महान ग्रंथ पीठापूरममध्ये साईबाबांच्या अवतरणाचे वर्णन केले आहे. हा इतिहास माहिती नसलेले भाेंदूबाबा अशाप्रकारचे बेताल बडबड करीत असतात. अशा भाेंदूंना समाजात तेढ निर्माण करायचे असल्याचा आराेप नाशिरकरांनी केला. हिंमत असेल तर धीरेंद्र शास्त्रीने चर्चेचे आव्हान स्वीकारावे किंवा आपली बडबड बंद करावी. नाहीतर जे साईबाबांना मानतात त्यांना हिंदू संप्रदायातून काढून टाकू असे जाहीर करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. या आंदाेलनात नाना झाेडे, पंकज महाजन, माेहन धवड तसेच साई पालखी परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित हाेते.