लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरली, पण तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने अजूनही पाऊल उचलले नाही. मार्च २०२० पासून बंद झालेल्या शाळा सरकारने डिसेंबर महिन्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्या. मार्च २०२१ पासून कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता सरकारने परीक्षाही रद्द केल्या. सध्या सरकारने अनेक क्षेत्र अनलॉक केले आहे. त्यामुळे शाळाही अनलॉक होणार की लॉकच राहणार? याकडे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.
कोरोनाचा सर्वात मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. मार्च महिन्यापासून बंद झालेल्या शाळा अजूनही बंद आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा सरकारला घेता आल्या नाहीत. पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या आणि नंतर दहावी व बारावीच्या परीक्षाही रद्द करून टाकल्या. मे महिन्याच्या मध्यंतरापासून कोरोनाची लाट ओसरत आहे. जिल्ह्यात ७ हजारांवर गेलेला कोरोना पॉझिटिव्हचा आकडा आता शंभरीच्या आत आला आहे. पण, तिसऱ्या लाटेसंदर्भातील चर्चा आणि वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होणारी चिंता लक्षात घेता सरकार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणार नाही, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते आहे.
जिल्ह्यात साडेचार हजारांवर शाळा आहेत. बहुतांश शाळा बंद असल्याने शाळांच्या देखभाल दुरुस्ती, साफसफाई, निर्जंतुकीकरणावर मोठा खर्च करावा लागणार आहे. विदर्भात २६ जूनपासून शाळा सुरू होतात. शासनाने शाळेसंदर्भात अजूनही कुठलेच पाऊल न उचलल्याने यंदा २६ जूनला शाळेची घंटा वाजणार नाही, असेच दिसते आहे.
- गुरुजींची शाळा सुरू होणार
गेल्यावर्षी शाळा बंद असल्या तरी प्रशासकीय कामासाठी शाळा सुरूच होत्या. शिवाय, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी संस्थाचालकांनी शिक्षकांना शाळेतही बोलाविले होते. शालेय पोषण आहाराचे वाटपही शाळेत झाले. सध्या शिक्षकांना सुट्या आहेत. पण, २६ जूननंतर प्रशासकीय कामकाजासाठी शिक्षकांना शाळेत बोलाविण्यात येणार आहे.
- शाळा सुरू करायची म्हटले तर...
मार्च २०२० पासून शाळा बंद झाली आहे. केवळ शाळाच नाही तर शाळेशी संलग्न असलेल्या सर्वच बाबी बंद आहे. त्यामुळे शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीपासून, स्कूलबसच्या मेंटेनन्सपर्यंत, खेळाचे मैदान, शिक्षकांचे वेतन, शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण असा किमान ५ लाखांच्या जवळपास खर्च आहे. विनाअनुदानित शाळांचा वांदा आहे. फी वसुली झाली नाही. त्यामुळे कर्ज काढूनच या सर्व सोयीसुविधा कराव्या लागणार आहे.
निशांत नारनवरे, संस्थाचालक
- विदर्भातील शाळा २६ जून रोजी सुरू होतात. परंतु, अद्यापपर्यंत वरिष्ठ स्तरावरून शाळा सुरू करण्यासंदर्भात सूचना आलेल्या नाहीत. शासनाकडून येणाऱ्या सूचनेनुसार अंमलबजावणी करू.
चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी, जि.प.