नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अजनीवनातील ४५०० झाडे कापणार आहे. ४५०० झाडे आपण दोन, तीन वर्षांत लावू शकतो का? शहरातल्या प्रत्येकाचं उत्तर नाहीच असेल. मग, एका प्रकल्पासाठी इतक्या झाडांची कत्तल योग्य आहे का? विकासाच्या अट्टाहासापोटी आपण मुर्दाड झालो आहोत का? या संतप्त प्रतिक्रिया आहेत निसर्गावर, एक-एका झाडावर प्रेम करणाऱ्या माणसांच्या. महापालिकेने इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाच्या नावावर अजनीवन भागातील हजारो झाडे तोडण्यासाठी जाहिरात दिली आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या मागणीवर या जाहिरातीने पर्यावरणप्रेमींच्या मनात असंतोष पसरला आहे. अनेक संघटनांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. अगदी काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन न मिळाल्याने मरणाऱ्यांचे नातेवाईक आक्रोश करीत होते आणि आज मोफत ऑक्सिजन देणारी झाडे कापण्याचे मूक समर्थक कसे बनू शकतो, असा सवाल पर्यावरणप्रेमींच्या मनात आहे.
- केंद्रीय मंत्र्यांनी झाडे न तोडण्याचे आश्वासन दिले होते. तरीही हजारो झाडे तोडण्यासाठी जाहिरात दिली जाते. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. याविरोधात येत्या ४ जूनपासून साखळी उपोषण सुरू करणार आहोत. झाडे तोडण्याच्या निर्णयावर विचार केला नाही, तर आंदोलन अतिशय तीव्र करू.
- अनिकेत कुत्तरमारे, सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्था
- झाडे तोडण्यावर एफआयआर नोंदविण्यासाठी महापालिका एवढी सक्रिय भूमिका घेत नाही आणि झाडे तोडण्यासाठी इतकी सक्रियता का? केवळ अहंकारी वृत्तीमुळे हजारो झाडे तोडण्याचा निर्णय केला जात आहे.
- अनसूया काळे छाबराणी, पर्यावरण कार्यकर्ता
अगदी १५ दिवसांपूर्वी शहरात ऑक्सिजनची मारामार चालली होती. आणि आता हजारो झाडे तोडली जात आहेत. लाखो ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा अधिक ऑक्सिजन अगदी मोफत या झाडांपासून मिळत असताना ही झाडे तोडण्याची दुर्बुद्धी येते कशी? १०० वर्षांपूर्वीची झाडे तोडून काय विकास साधणार आहे ही यंत्रणा? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महापौर या निर्णयावर काही बोलणार आहेत की नाही? की नागपूर शहराला वाऱ्यावर सोडले आहे.
- जोसेफ जॉर्ज, पर्यावरण कार्यकर्ता