विधान परिषदेत लक्षवेधी : वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली दखल नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दुपारनंतर सुरक्षेची जबाबदारी केवळ तीनच रक्षकांवर असते. यामुळे रुग्ण, नातेवाईक व डॉक्टरांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर निकामी झालेले शरीरातील अवयव किंवा ट्युमर, इंजेक्शन व उपचार करताना वापरलेल्या जैव वैद्यकीय कचरा रुग्णालयाच्या परिसरात पडलेला असतो. यातच रुग्णालयाच्या मागील परिसर झाडांनी वेढल्याने रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्यांना घेऊन आ. प्रा.अनिल सोले,नागोराव गाणार, गिरीश व्यास ,मितेश भांगडिया यांनी विधान परिषदेत लक्षवेधी उपस्थित केली. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी अधिवेशनानंतर सात दिवसांच्या आत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन समस्यांची पाहणी केली जाईल, असे उत्तर दिले.‘लोकमत’ने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या या समस्यांना घेऊन वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर याची चर्चा विधान परिषदेत झाल्याने समस्या सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.‘सुपर’मध्ये रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात, तर दोनशेवर रुग्ण भरती राहतात. त्यांच्यासोबत नातेवाईकांचाही राबता असतो. रुग्णाच्या देखभालीसाठी डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी असतात. परंतु यांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ १४ सुरक्षा रक्षकांवर आहे. सकाळी बाह्यरुग्ण विभागाच्यावेळी आठ रक्षक असतात. परंतु दुपार आणि रात्री पाळीत तीन-तीन रक्षकच असतात. यामुळे सुरक्षेचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे. रुग्णालयातून रोज निघणारा जैव वैद्यकीय कचरा संकलन करण्याची विशेष सोय नाही. परिणामी, रुग्ण व नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या शिवाय रुग्णालयाच्या दर्शनी भाग सोडल्यास परिसरात झुडूपे वाढलेली आहेत. यामुळे किटकांचा त्रासही वाढला असून रुग्ण त्रस्त आहेत. या सर्व समस्यांना वाचा फोडण्यासाठी आ. प्रा. अनिल सोले यांच्यासह चार आमदारांनी विधान परिषदेत लक्षवेधी उपस्थित केली. यावर गुरुवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी, रुग्णालयाच्या सुरक्षेकरिता ‘मेस्को’संस्थेकडून सेवा घेण्यात येत आहे. स्वच्छतेकरिता चार अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, असे उत्तर दिले. मात्र लक्षवेधीचे हे उत्तर दिशाभूल करणारे आहे, उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी व मंत्र्यांनी या रुग्णालयाचा दौरा करावा, अशी मागणी आ. सोले यांनी केली. यावर महाजन यांनी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले, आणि अधिवेशन संपल्यानंतर सात दिवसांच्याआत स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत प्रत्यक्ष पाहणी केली जाईल, असे सभागृहाला आश्वासित केले. (प्रतिनिधी)
‘सुपर’च्या समस्या सोडविणार
By admin | Published: March 10, 2017 2:42 AM