छोटू भोयर : समस्येची केली पाहणीनागपूर : नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर यांनी आयुर्वेदिक ले-आऊटमधील मिरची बाजार, सक्करदरा चौक येथील नासुप्रच्या गाळ्यांमध्ये जाऊन येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गाळेधारकांनी छतामधून होत असलेली पाण्याची गळती, बगिच्याची साफसफाई, विद्युत व्यवस्था, घाणीचे साम्राज्य, पार्किंग व्यवस्था आदी समस्या मांडल्या. या समस्या लवकरच सोडविण्याची मागणी केली. छोटू भोयर यांनी सर्व नागरिकांचे म्हणणे व्यक्तिश: ऐकून घेतले. ज्या ज्या विभागाशी संबंधित ज्या समस्या आहेत, त्या त्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपण त्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी छोटू भोयर यांनी दिले. नासुप्रचे अधिकारी ज्या गाळ्यांची पाहणी करतील व आवश्यक सुविधा पुरवतील, असेही त्यांनी आश्वस्त केले. यावेळी त्यांच्यासोबत नासुप्रच्या दक्षिण विभागाचे इंजिनीअर धनकर, नगरसेविका रिता मुळे उपस्थित होते. यावेळी परिसरातील रहिवासी अॅड. मोहन वाघमारे, ईश्वर धांडे, राजू फुटाणे, राठोड, महेंद्र बालपांडे, अॅड. टाकतोंडे, सातफळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नासुप्र गाळेधारकांच्या समस्या सोडविणार
By admin | Published: August 01, 2014 1:15 AM