मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटननागपूर : एस टी महामंडळ ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. खासगी वाहतुकीप्रमाणे नफ्याचा विचार न करता कमी नफा असलेल्या मार्गावर एसटीची बस धावते. एसटीचे कामगार वंचितांना सेवा देतात. त्यामुळे एसटी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उमरेड मार्गावर बहादुरा टोल नाक्याजवळ आयोजित अधिवेशनात हजारो एसटी कामगारांना मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधाकर कोहळे, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, एसटीचे कामगार हे सामान्य जनतेला सेवा देणारे आहेत. लोकशाही प्रक्रियेत संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार सामान्य जनतेच्या सेवेसाठी शासनाच्या माध्यमातून जे विविध उपक्रम राबविण्यात येतात त्यात या लोकशाहीच्या बसची दोन चाके शासनाची आहेत तर दोन चाके एस टी महामंडळाची आहेत. त्यामुळे कामगारांच्या अपेक्षा रास्त आहेत. कामगारांनी त्यांच्या मागण्या मांडतानाच आपले कर्तव्य चोख बजावणे गरजेचे आहे. कामगारांनी २१ व्या शतकातील मूल्य समजून घेऊन आपली कार्यक्षमता तसेच पारदर्शकपणा वाढविण्याचा प्रयत्न करावा. नोकर भरतीत कामगारांच्या मुलांना पाच टक्के आरक्षण, वैद्यकीय अपात्र कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नोकरी, वैद्यकीय कॅशलेस योजना, मोफत पास सर्व गाड्यांना लागू करणे आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना पती-पत्नीस वर्षभर मोफत पास देण्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल. कनिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न लवकरच निकाली काढण्याची घोषणा त्यांनी केली. सातव्या वेतन आयोगासंदर्भात केंद्र शासनाकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्यामुळे हा आयोग राज्यात लागू झाला नाही. हा आयोग राज्यात लागू झाल्यानंतर एसटी कामगारांसाठी तो लागू करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांशिवाय महाराष्ट्र चालूच शकत नसून ही बाब प्रतिकुल परिस्थितीत सेवा देणाऱ्या कामगारांमुळे शक्य झाली आहे. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एसटी कामगारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार, अधिवेशनाच्या आयोजनासाठी स्वागताध्यक्ष सुभाष वंजारी यांचा सत्कार आणि स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी आपल्या भाषणात कामगारांच्या विविध मागण्या मांडल्या. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष सुभाष वंजारी यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. अधिवेशनाला संघटनेचे ५० हजार कामगार उपस्थित होते.
एसटी कामगारांचे प्रश्न सोडविणार
By admin | Published: February 29, 2016 2:51 AM