नागपूर :विदर्भाच्या विकासासाठी विदेशी व्यवहार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मिहान आयसीडीमध्ये निर्यातक आणि आयातदारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून त्याच्या समस्या सोडविण्याकरिता विभाग प्रयत्नरत असल्याचे मत सीमाशुल्क, जीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे (नागपूर विभाग) मुख्य आयुक्त आर. सी. सांखला यांनी येथे व्यक्त केले.
नागपूर कस्टम विभागाने अलीकडेच स्थापन केलेल्या पहिल्या स्थायी व्यापार सुविधा समितीच्या (पीटीएफसी) पहिल्या बैठकीत ते बोलत होते. आर. सी. सांखला यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीला सीमाशुल्क आयुक्त अभयकुमार, अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी, उपायुक्त पंकज झा, सहायक आयुक्त व सेझ-मिहानचे विशेष अधिकारी अविनाश पांडे, सीमाशुल्क विभागाचे इतर अधिकारी, नागपूर कस्टम्सच्या नाशिक व छत्रपती संभाजीनगर चॅप्टर सेलचे भागधारक, निर्यातक, आयातदार, ब्रोकर, शिपिंग लाइन एजंट उपस्थित होते. कॉनकोरचे महाव्यवस्थापक अनिल सोनावणे, मुख्य व्यवस्थापक संतोष कुमार, आयसीडी मिहानचे सहायक आयुक्त कृष्ण कुमार यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
सांखला म्हणाले, पोर्टवरून कंटेनरची ने-आण करण्यासाठी जास्त वेळ लागतो. कंटेनरची स्वच्छता, लोडिंग, अनलोडिंग, ट्रॅकिंग या समस्यांनी अनेक त्रस्त आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना नुकसान सोसावे लागते. अनेक समस्या आम्हाला एकत्रितरीत्या सोडवाव्या लागतील. पुढेही अशाच बैठकीच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी विभागाचा पुढाकार राहील.
अनिल सोनावणे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून आयसीडी मिहानमध्ये वाहतूक वाढली असून ती दूर करण्याचा अधिकाऱ्यांचा नेहमी प्रयत्न असतो. याची माहिती मुख्यालयाला दिली जाते. अनेक समस्या जागेवरच सोडविण्यात आल्या आहेत. पोर्ट, रेल्वे आणि शिपिंग लाइनच्या समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.