लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जाईल ही शालेय शिक्षण विभागाची घोषणा फोल ठरली आहे. १ जुलैला शाळा सुरू झाल्या परंतु आता कटींग केलेले कापड उपलब्ध केले जात आहे. सध्या चार तालुक्यांसाठी नियमित गणवेशाचे तर तीन तालुक्यांना स्काऊड गाईट गणवेशाचे कापड आले आहे. अद्याप सर्व तालुक्यांना कापड मिळालेले नाही. त्यामुळे १५ ऑगस्टला तरी विद्यार्थी नवीन गणवेशात दिसतील का असा प्रश्न पालकांना पडला आहे. दुसरीकडे अद्याप सर्व तालुक्यांना कापड उपलब्ध न झाल्याने शिक्षकांचीही चिंता वाढली आहे.
नागपूर जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या जवळपास ८० हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी गणवेश न मिळाल्याने विद्यार्थी जुन्या गणवेशात येत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर चार दिवसांनी जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये गणवेशाचे कापड पोहोचले. नियमित गणवेशाचे कापलेले कापड ४ तालुक्यात तर स्काऊट-गाईट गणवेशाचे न कापलेले कापड तीन तालुक्यात पोहोचल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. अद्याप नऊ तालुक्यात नियमित तर दहा तालुक्यात स्काऊड गाईड गणवेशाचे कापड पोहचलेले नाही. गणवेश शिवण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) महिला बचत गटामार्फत केले जाणार आहे. गणवेश शिलाई आणि तयार झाल्यावर ते केंद्रीय स्तरावर पाठवले जातील. तेथून ते संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना आपापल्या शाळेत नेण्यासाठी वितरित केले जाईल. परंतु गणवेश विद्यार्थ्यांना व्यवस्थित होईल की नाही याबाबतही शंका आहे.
एका गणवेशाच्या शिलाईसाठी १०० रुपये स्काऊटच्या गणवेशाचे कापड हिंगणा, काटोल, नरखेड या तालुक्यांमध्ये पोहोचवण्यात आले. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कापड मंजूर केले. विद्यार्थी संख्येनुसार तहसील स्तरावरील शाळांना कापड पाठवले जाईल. शाळा व्यवस्थापन समितीला स्थानिक टेलर किंवा महिला बचत गटाकडून गणवेश शिवून घ्यावा लागेल. संपूर्ण शिक्षा अभियानाशी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात प्रति गणवेश १०० रुपये शिलाई शुल्काची रक्कम जमा केली जाईल. परंतु ही रक्कम कमी असल्याचे बचत गटांचे म्हणने आहे.