नागपूर : मागील दाेन दिवसांपासून वातावरणाने अचानक कुस बदलली. रात्री पावसाच्या सरी काेसळल्या तर गुरुवारी दिवसभर आकाशात ढगांनी गर्दी केली होती. पुढील दाेन-तीन दिवस असेच ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे हिवाळ्यानंतर उन्हाळा येताे की पावसाळा देवा, असा काहीसा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे.
बुधवारी दुपारपासून वातावरणाचा रंग बदलला आणि पावसाची हलकी रिपरिप सुरू झाली. मात्र, रात्री पावसाच्या सरींनी जाेरदार हजेरी लावली. सकाळपर्यंत नागपुरात १९.३ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. गुरुवारी दिवसभर आकाश ढगांनी व्यापले हाेते. मात्र, पावसाने उघडीप दिली. हलक्या थेंबांच्या उपस्थितीने सायंकाळपर्यंत १ मिमी पाऊस नाेंदविला गेला. नागपूरसह संपूर्ण विदर्भाचे आकाश ढगांनी व्यापले हाेते. अमरावती (१.४ मिमी), चंद्रपूर (१ मिमी) व यवतमाळ (२ मिमी) अशी हलकी रिपरिप झाली. दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले असून, ते मराठवाडा व तेलंगणाकडे वळले आहे. शिवाय वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव पडल्याने विदर्भाचे वातावरण बदलले आहे. पुढील तीन दिवस आकाशात ढगांची गर्दी व हलका पाऊस हाेण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे दिवसाच्या तापमानात कमालीची घसरण झाली आहे. २४ तासात नागपूरचे कमाल तापमान ७.२ अंशाने घसरले असून, २३.२ अंश नाेंद झाली आहे व ते सरासरीपेक्षा ९ अंश कमी आहे. १६.४ अंशासह रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या वर आहे. याशिवाय गाेंदियामध्ये कमाल २३.४ अंश व किमान १४.६ अंश, वर्धा २६.५ अंश व १९.२ अंश, ब्रम्हपुरी २५.३ अंश व १८.४ अंश, अमरावती २८ व १६.७ अंश तापमान नाेंदविण्यात आले. १३.६ अंशासह बुलढाणा व १३.५ अंशासह वाशिममध्ये रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा घसरण झाली आहे.