लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सॅनफ्रॅन्सिस्को येथे आयोजित हवामान व ऊर्जेच्या जागतिक बदलावर आधारित परिषदेत महापौर नंदा जिचकार यांनी खासगी सचिव म्हणून मुलालाच नेल्याच्या मुद्यावरून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसने हा मुद्दा अतिशय गंभीरतेने घेतला असून राष्ट्रीय पातळीवरदेखील याची दखल घेण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आशिष दुआ यांनी या दौऱ्यावर टीका केली आहे. महापौरांवर कुठली कारवाई होणार का असा प्रश्न त्यांनी ‘ट्विट’च्या माध्यमातून उपस्थित केला आहे.महापौरांच्या या दौऱ्यावर स्थानिक काँग्रेस पदाधिकाºयांकडून जोरदार टीका करण्यात आली. ‘सोशल मीडिया’वरदेखील विविध प्रश्न उपस्थित झाले. आशिष दुआ यांनी यासंदर्भात सोमवारी ‘ट्विट’ केले. आपल्याला असलेल्या विशेषाधिकारांचा भाजपाने दुरुपयोग केला आहे. मात्र यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. महापौरांनी सार्वजनिक साधनसंपत्तीचा स्वत:च्या खासगी फायद्यासाठी उपयोग करणे हा भ्रष्टाचाराचा अत्युच्च नमुना असला तरी यावर काही कारवाई होणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.