नीलेश देशपांडे
नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १ डिसेंबरला विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठास्थित मैदानावर होणारा टी-२० सामना सामना अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकला आहे. कारण व्हीसीएचे मैदान सध्या पाण्याच्या योग्य निचऱ्यासाठी काही ठिकाणी खोदण्यात आले आहे. त्यामुळे जर या कामास अधिक विलंब लागला तर हा सामना रायपूरला स्थलांतरित केला जाऊ शकतो.
व्हीसीएतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कामाचे स्वरुप बघता १ डिसेंबरपर्यंत मैदान पूर्णपणे सुसज्ज करणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे हा सामना रायपूरला हलविला जाण्याचीच जास्त शक्यता आहे. या विषयी व्हीसीएचे सीईओ फारुख दस्तुर यांना विचाराले असता ते म्हणाले, बीसीसीआयकडून आम्हाला अद्यापतरी कुठलीही सूचना प्राप्त झालेली नाही.
दुसरीकडे छत्तीसगड क्रिकेट असोसिएशन आणि पोलिस विभागाला सामन्याची तैयारी सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळते आहे. तसेच सामन्याच्या आयोजनाविषयीची चर्चेची पहिली फेरीही आटोपली असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने कळाले. विशेष म्हणजे व्हीसीएवर सध्या सुरू असलेल्या कामाचे वृत्त लोकमतने याआधीच प्रकाशित केले होते. त्यावेळी वेळेत काम पूर्ण करण्याचा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला होता.