लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगातील इतर संत्र्यांच्या तुलनेत नागपुरी संत्र्यांची उत्पादकता कमी आहे. संत्र्यांचे दर दबावात राहत असल्याने विदर्भातील संत्रा उत्पादकांना नुकसान सहन करावे लागते. अधिक उत्पादकता व चवीला गोड असलेला स्पेनमधील टॅगो गोल्ड संत्रा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर अॅग्रोव्हिजन फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी (दि. ११) रोजी धरमपेठ येथील वनामतीच्या सभागृहात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
विदर्भातील नागपुरी संत्र्याचे उत्पादन प्रतिएकर पाच टनांच्या आसपास असून, स्पेनमधील व्हॅलेन्शिया टॅगो गोल्ड संत्र्याचे उत्पादन एकरी ३० ते ३५ टन उत्पादन घेतले जाते. विदर्भात संत्र्यांचे ज्या दिवशी उत्पादन वाढेल, त्या दिवशी येथील संत्रा उत्पादक शेतकरी समृद्ध होतील. टैंगो गोल्ड हा जगप्रसिद्ध संत्रा असून, त्याचे विदर्भात सहज उत्पादन घेतले जाऊ शकते, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नाशिक येथील सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी, अॅग्रोव्हिजन आणि महाऑरेंजच्या सदस्यांसह विदर्भातील संत्रा उत्पादकांनी व्हॅलेन्शियाचा नुकताच दौरा केला आणि तेथील संत्रा उत्पादनापासून तर विक्री व प्रक्रियेपर्यतची संपूर्ण माहिती जाणून घेतली. व्हॅलेन्शियामधील टॅगो गोल्ड संत्रा भारतात आणून नागपुरी संत्र्याच्या बरोबरीने त्याचे उत्पादन घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
स्पेनकडून खूप काही शिकण्याजोगेसंत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या स्पेनमधील व्हॅलेन्शिया भागात संत्र्यावर सातत्याने वेगवेगळे प्रयोग केले जातात. माती व पाणी परीक्षण, संत्र्याचे नर्सरी, कुंडीतील रोपट्यांचे बडिंग, कलमे तयार करण्याची व कुंड्या ठेवण्याची पद्धती, त्याची वैज्ञानिक कारणे, बागा लावणे व झाडांचे संगोपन, मशागत पद्धती, मल्चिंग पेपरचा वापर, खते व पाण्याचे व्यवस्थापन, झाडांचे प्रुनिंग, झाडांच्या फांद्या ४५ अंशांच्या कोनात वाकवून त्यांना आकार देणे, संत्र्याचे ग्रेडिंग, सॉटिंग, पॅकेजिंग आणि बॅण्डिंग करून संत्रा जगभरातील ग्राहकांपर्यंत पाठविणे या संपूर्ण साखळीतील प्रत्येक बाबीत खूप काही शिकण्याजोगे व ते अमलात आणण्याजोगे असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
"टंगो गोल्ड संत्र्याच्या उत्पादनामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलणार आहे. स्पेन दौऱ्यात आम्ही संत्रा उत्पादन ते विपणन या साखळीचा बारकाईने अभ्यास केला. या संपूर्ण साखळीतील प्रत्येक बाबीची माहिती जाणून घेतली. त्यांची संत्रा उत्पादन पद्धती व तंत्रज्ञानाचा विदर्भात वापर करून संत्रा उत्पादन करण्याचा आमचा मानस आहे."- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री