नागपूर : नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा व त्याच्या साथीदारांची आजन्म कारावासासह इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये कायम राहील की नाही, या प्रश्नाच्या उत्तरासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या प्रकरणावरील अंतिम सुनावणी न्यायमूर्तीद्वय रोहित देव व अनिल पानसरे यांच्यासमक्ष गुरुवारी पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला.
७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबासह महेश करिमन तिरकी, हेम केशवदत्ता मिश्रा, प्रशांत राही नारायण सांगलीकर, विजय नान तिरकी व पांडू पोरा नरोटे यांना दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून जन्मठेपेसह विविध कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याविरुद्ध सर्व आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. दरम्यान, गेल्या २५ ऑगस्ट रोजी नरोटे (रा. मुरेवाडा, ता. एटापल्ली) याचा आजारपणामुळे मृत्यू झाला. परिणामी, उच्च न्यायालयात केवळ उर्वरित आरोपींचे अपील विचारात घेण्यात आले.
साईबाबा ९० टक्के दिव्यांग असून तो दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता. महेश तिरकी मुरेवाडा, ता. एटापल्ली (गडचिरोली), मिश्रा कुंजबारगल, जि. अलमोडा (उत्तराखंड), राही देहरादून (उत्तराखंड) तर, विजय तिरकी धरमपूर, ता. पाखंजूर, जि. कांकेर (छत्तीसगड) येथील रहिवासी आहे.