निशांत वानखेडे
नागपूर : सध्या सुरू असलेला पाऊस पुढचे काही दिवस उघडीप देईल, अशी आशा आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या उत्साहाला वेग येईल. मात्र हा आनंदाेत्सव फटाक्यांची आतषबाजी करूनच साजरा करावा का, हा गंभीर प्रश्न आहे. फटाके फाेडल्याने प्रदूषण तर हाेणारच आहे. त्यामुळे प्रदूषण टाळण्यासाठी फटाक्यांपासून दाेन हात लांब राहिलेले बरे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.
काेराेनाकाळातील दाेन वर्षे काेणताही सण उत्साहात साजरा करता आला नाही. याची खंत हाेती. या काळात प्रदूषण झाले नसल्याचे समाधानही हाेते. दाेन वर्षे दाबलेला उत्साह गेल्यावर्षी जाेरात बाहेर आला आणि नागरिकांनी फटाक्यांची मनसाेक्त आतषबाजी केली. अपेक्षेप्रमाणे पुढे त्याचे परिणामही दिसले. गेल्यावर्षी दिवाळीच्या तीन दिवसांत वायुप्रदूषणाचा निर्देशांक ३०० च्या पार गेला. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक २५० ते ३०० पर्यंत पाेहोचला हाेता. शहरातील महाल, गांधीबाग, सीए राेड, सदर, धरमपेठ, खामला, मानेवाडा या भागात एक्यूआय ३०० च्या आसपास गेला हाेता. पीएम-१० धूलिकणांचा स्तर ३५० ते ४०० पर्यंत पाेहोचला हाेता. यावर्षी हा स्तर त्याही पलीकडे जाईल, अशी भीती संस्थेने व्यक्त केली आहे.
गाेंगाटही फार
गेल्यावर्षी दिवाळीत ३ ते ५ नाेव्हेंबरदरम्यान नीरीने शहरातील दहा झाेनमध्ये अनेक ठिकाणी ध्वनिप्रदूषणाचे निरीक्षण केले. त्यात तब्बल ६२ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाने प्रचंड गाेंगाट झाल्याचे निदर्शनात आणले. हनुमाननगर, नेहरूनगर, आसीनगर, सतरंजीपुरा, लक्ष्मीनगर, लकडगंज व मंगळवारी झाेनमध्ये ४६ ठिकाणी ध्वनिप्रदूषणाचा स्तर ७५ ते ८० डेसिबल व १६ ठिकाणी ताे ८० डीबीच्या वर पाेहोचला हाेता.
फटाक्यांतून निघतात हे प्रदूषित वायू
फटाके तयार करताना काॅपर, झिंक, लेड, साेडियम, मॅग्निशियम, कॅडमियम यांसारख्या घातक धातूंचा वापर केला जाताे. फटाके फाेडल्यानंतर सल्फर डायऑक्साईड, नायट्राेजन डायऑक्साईड, कार्बन माेनाक्साईड या वायूचे तसेच निकेल, कॅडमियम, क्राेमियम या जड धातूंचे प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरते. शिवाय धूलिकणांचा धाेकादायक स्तर वाढताे.
पाऊस आला तर...
नीरीच्या एका वरिष्ठ वैज्ञानिकाने सांगितले, सध्यातरी पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे प्रदूषणाचा स्तर निरीक्षणासाठी उपकरण लावता येणार नाही. कदाचित पाऊस राहिला तर फटाक्यांची आतषबाजी कमी हाेईल, अशी अपेक्षा आहे. पाऊस थांबला तर निरीक्षण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.