मेहा शर्मा
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रकोपात नियमित उपचार घेत असलेले कर्करुग्ण आरोग्यविषयक प्रोटोकॉलमुळे हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नव्हते. निरंतर उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना कोरोनामुळे वेळेत उपचार घेता आले नसल्याने, पुढील दोन वर्षात हा आजार विक्राळ रूप धारण करण्याची शक्यता नॅशनल कॅन्सर ग्रीड ऑफ इंडियाच्या संशोधकांनी आपल्या लॅन्सेट ऑन्कोलॉजी संशोधनात व्यक्त केली आहे.
कोरोना संक्रमणाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या लाटेतील संक्रमणाच्या धास्तीने त्या काळात ८३,६०० ते १,११,५०० रुग्णांना कर्करोग झाल्याचे निदान होऊ शकले नव्हते. सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या लाटेतील ओमायक्रॉनचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम सौम्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कसलीही रिस्क घेण्याच्या मनस्थितीत कर्करुग्ण नाहीत. आजाराच्या तिव्रतेचे वेळीच निदान व्हावे आणि उपचार सुरू करता यावे म्हणून कर्करुग्ण स्वत:च पुढाकार घेत असून, हॉस्पिटलमध्ये येताना दिसत आहेत; मात्र अजूनही ५० टक्के कर्करुग्ण हॉस्पिटलमध्ये येत नाहीत, ही चिंतेची बाब असल्याचे आरएसटी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलचे ऑन्कोलॉजिस्ट डॉ. श्रीराम काणे यांनी सांगितले. मी स्वत: कोरोना संक्रमण झालेल्या सहा-सात कर्करुग्णांना हाताळले आहे. त्यांच्यात अगदीच सौम्य लक्षणे होती. आम्ही आता रुग्णांमधील भीती घालविण्याचे प्रयत्न करत असून, त्यांना पुढील उपचार घेण्यास प्रोत्साहित करत असल्याचे डॉ. श्रीराम काणे म्हणाले.
सामान्य कोरोना संक्रमित रुग्ण आणि कोरोना संक्रमित कर्करुग्ण यांच्यात तसा किरकोळ फरक असून, कर्करुग्णांना फुफ्फुसाचा संसर्ग झालेला आढळला नाही किंवा त्यांना ऑक्सिजनची गरजही भासलेली नाही. अशा रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारीही कमी आहे. दीर्घ प्रवास करून उपचारासाठी येणाऱ्या बाहेरगावच्या रुग्णांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे अवघड जाते; मात्र पुढच्या दोन-तीन आठवड्यात परिस्थिती आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत असल्याचेही डॉ. काणे यांनी सांगितले. कोरोना संक्रमित कर्करुग्णांवरील उपचार इतरांसारखाच असून, सौम्य लक्षणे असलेल्या संक्रमित रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची परवानगी आयसीएमआरने दिली असल्याने कर्करुग्णांवरील उपचार सहज झाल्याचे डॉ. काणे यांनी सांगितले.
लसीकरण हे रुग्णांना मानसिक बळ देणारे ठरले असून, आता बूस्टर डोस घेण्यासाठीही प्रोत्साहित करत आहोत. त्यामुळे कर्करुग्ण उपचारासाठी स्वत:च येत असल्याचे ऑन्कोलॉजिस्ट डॉ. वैभव चौधरी यांनी सांगितले.
..............