लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : अतिशय विपरीत परिस्थितीत जीवाची बाजी लावत कोरोना रुग्णांवर उपचार करणारे कंत्राटी मनुष्यबळ कार्यमुक्त करीत कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश धडकल्यानंतर आता येत्या काही दिवसात उमरेडच्या कोविड सेंटरला कुलूप लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आदेशाचे पत्रच तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात धडकले असल्याची माहिती आहे. कंत्राटी मनुष्यबळ कमी करणे तसेच कोविड सेंटरसुद्धा बंद करणे यावरून चांगलाच संताप व्यक्त होत असून, उद्या साेमवारपासून ठिय्या आंदोलनाचा इशारा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा मंत्री रोहित पारवे यांनी दिला आहे.
उमरेड येथील कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत ३०० च्या आसपास कोविड रुग्णांवर उपचार करण्यात आले. शिवाय अगदी काही दिवसांपूर्वीच एकाच कुटुंबातील डेल्टा रुग्णांवरही येथील कर्मचाऱ्यांनी औषधोपचार केले. एकूण ८० बेडच्या या कोविड सेंटरचा कारभार तीन डॉक्टर आणि १२ परिचारिका चालवित होत्या. शिवाय बरे होणाऱ्या रुग्णांचीही संख्या चांगली होती. अन्य महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यापेक्षा या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी नागरिकांची पसंती होती. असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांचा सहकार्याने आणि पुढाकाराने उमरेडचे कोविड सेंटर उत्तम सोयीसुविधा दिल्या जात होत्या. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अतिशय योग्य पध्दतीने कंत्राटी चमूने मुकाबला केला होता. या कर्मचाऱ्यांच्या एकूणच टीमवर्कमुळे अधिकारी, लोकप्रतिनिधी जाम खुश होते. शिवाय येथील चमू कोविड रुग्णांवर उपचारासाठी तरबेज झाली होती. अशी उत्तमोत्तम व्यवस्था असताना हे कोविड सेंटर बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी पत्र आले असल्याचे मान्य केले. आदेशानुसार आम्ही पुढील कारवाई करणार असल्याचे ते बोलले.
....
ठिय्या आंदोलन करणार
कोविड सेंटर बंद केल्यानंतर पुन्हा कंत्राटी डॉक्टर व परिचरिकांची जुळवाजुळव करणे अवघड होईल. तिसरी लाट आल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी रोहित पारवे यांनी केली आहे. साेमवारपासून उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.