नागपूर : नागपुरात भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसचे उमेदवार आ. विकास ठाकरे यांच्यात थेट लढतीचे चित्र आहे. गडकरी विजयाची ‘हॅटट्रिक’ मारण्यासाठी रिंगणात उतरले असून विकास ठाकरे हे त्यांचा विजयरथ रोखतील का, याचीच सध्या नागपुरात चर्चा रंगली आहे. गडकरींसाठी अख्खी भाजप ताकदीने मैदानात उतरली असून ठाकरेंसाठी काँग्रेस नेतेही गटतट विसरून एकत्र आल्याचे चित्र आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघात अखेरच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. आता २६ उमेदवार रिंगणात आहेत. विकास पुरुष अशी इमेज असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गेल्या दहा वर्षांत नागपुरात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनते समोर मांडत आहेत. गडकरींसाठी आ. कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, प्रवीण दटके या आमदारांसह पदाधिकाऱ्यांची फौज मैदानात उतरली आहे. गल्लीबोळात जाऊन स्वत: गडकरींनी केलेल्या विकासकामांची पत्रके वाटत आहेत. नागपूरच्या विकासासाठी गडकरींशिवाय पर्याय नाही, हे मतदारांना पटवून दिले जात आहे. यावेळी जास्तीत जास्त मतांनी गडकरींना विजयी करून देशात संदेश देण्यासाठी भाजप कामाला लागली आहे.
दुसरीकडे जमिनीवरील नेता अशी ओळख असलेले आ. विकास ठाकरे यांच्यासाठी गटबाजी सोडून काँग्रेस एकवटली आहे. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिस अहमद यांच्यासह सर्व नेते मतभेद विसरून कामाला लागल्याचे चित्र समोर आल्याने काँग्रेसी मतदारांचे हौसले बुलंद झाले आहेत. आ. ठाकरे हे शहर काँग्रेसचे अध्यक्ष असल्याने पक्ष संघटनाही चार्ज झाली आहे. शहरातील मुख्य रस्ते झाले पण अंतर्गत वस्त्यांमध्ये काहीच सुधारणा झाली नाही, असे सांगत ठाकरे हे वीज, पाणी, स्वच्छता यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालत आहेत.बसपाकडून योगिराज लांजेवार रिंगणात आहेत. गेल्या दोन निवडणुकीत बसपाचा हत्ती पाहिजे तसा धावलेला नाही. यावेळी लांजेवार हे किती जोर मारतात, बसपाचे कॅडर त्यांच्यासाठी किती सक्रिय होते, याकडे लक्ष लागले आहे. बीआरपीने विशेष फुटाने यांना रिंगणात उतरविले आहे. नागपुरात दोन्ही बाजूंनी ‘सायलेंट’ प्रचार सुरू असून सध्यातरी ही निवडणूक वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांकडे वळलेली नाही.
‘वंचित’ व ‘आप’ची काँग्रेसला साथ
एमआयएमही नाही मैदानात- वंचित बहुजन आघाडीने नागपुरात उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यामुळे काँग्रेसला पाठबळ मिळाले आहे. एमआयएमनेही उमेदवार दिलेला नाही. यामुळे मागासवर्गीय, दलित व बहुजन मतांचे विभाजन टाळण्यास मदत होईल, असा काँग्रेसचा दावा आहे. आम आदमी पक्ष महाविकास आघाडीत सहभागी असल्यामुळे नागपुरात ‘आप’चे कॅडर काँग्रेसच्या कामाला लागले आहे. भाजपने हे सर्व धोके विचारात घेऊन बूथ मॅनेजमेंट केले आहे. त्यामुळे निवडणूक एकतर्फी होईल की चुरशीची याचीच चर्चा नागपूरच नव्हे, तर देशात सुरू झाली आहे.