नररूपी सैतान विवेक पालटकरच्या फाशीवर शिक्कामोर्तब होईल का? हायकोर्टात खटला दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2023 08:29 PM2023-06-26T20:29:00+5:302023-06-26T20:30:32+5:30
Nagpur News विवेक गुलाब पालटकर (४०) यांच्याविरुद्धचा खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम ३६६ अनुसार सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बंधनकारक आहे. त्यामुळे नररूपी सैतान विवेक गुलाब पालटकर (४०) यांच्याविरुद्धचा खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला आहे.
पालटकरने स्वत:चा चिमुकला मुलगा, बहीण, बहिणीचा पती, मुलगा व सासू यांचा क्रूरपणे खून केला आहे. १५ एप्रिल २०२३ सत्र न्यायालयाने पालटकरला भादंविच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत फाशी व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पाच वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. पालटकरने या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये अपीलद्वारे आव्हान दिले आहे. करिता, उच्च न्यायालय फाशी शिक्कामोर्तबाचा खटला व या अपिलवर एकत्र सुनावणी करेल.
मृतांमध्ये कमलाकर मोतीराम पवनकर (४८), त्यांच्या पत्नी अर्चना (४५), आई मीराबाई (७३), मुलगी वेदांती (१२) व भाचा कृष्णा (५) यांचा समावेश आहे. अर्चना ही आरोपीची बहीण, तर कृष्णा हा मुलगा होता. पवनकर कुटुंब दिघोरीतील आराधनानगर येथे राहत होते. आरोपी विवेकला पत्नीच्या खुनात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याला न्यायालयातून सोडविण्यासाठी कमलाकर यांचे सुमारे पाच लाख रुपये खर्च झाले होते. त्यामुळे कमलाकर आरोपीला पैसे मागत होते. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यातून आरोपीने ११ जून २०१८ रोजी मध्यरात्रीनंतर संबंधित पाचही जनांचा निर्घृण खून केला.